जम्मू : वृत्तसंस्था
भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. दरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा महेबुबा मुफ्ती यांनी ‘बस्स झाले आता युद्ध थांबवा…’ असे दोन्ही देशांना आवाहन केले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना मुफ्ती यांना अश्रू अनावर झाले.
पीडीपी नेत्या मुफ्ती म्हणाल्या की, सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे सीमावर्ती भागातील लोक, विशेषत: महिला आणि मुले बेघर होत आहेत आणि भयभीत आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील लोक किती काळ हा त्रास सहन करतील, असा सवाल देखील मुफ्ती यांनी विचारला. त्यामुळे दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले आहेह्व.
भारत पाकिस्तान हल्ल्यादरम्यान दोन्ही बाजूंचे नागरिक बळी पडत आहेत. मुलं मारली जात आहेत, महिला मारल्या जात आहेत. दोन्ही देशांना माझी विनंती आहे की, दोन्ही देशांनी हल्ले बंद करावेत. युद्ध हे प्रत्येक गोष्टीचा उपाय नाही. या संकटकाळात लष्करी स्थापनाऐवजी राजकीय हस्तक्षेप आवश्यक आहे, असेही मुफ्ती त्यांनी स्पष्ट केले.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा सूड म्हणून भारताने पाकिस्तानी दहशतवादविरोधात ऑपरेशन सिंदूर राबविले. यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारतीय सशस्त्र दल देखील जोरदार प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरमधील पीडीपी नेत्या महबुबा मुफ्ती यांना भारत-पाकिस्तान सीमाभागातील सध्याच्या परिस्थितीवर माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले.