29.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeलातूरबांधकाम कामगार कार्यालयातील वडार समाजाचा वाटा आहे कुठे?

बांधकाम कामगार कार्यालयातील वडार समाजाचा वाटा आहे कुठे?

लातूर : प्रतिनिधी
कामगार हा या देशाच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. किंबहुना कामगार हा या देशाच्या विकासाचा कणा आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. या कामगारांच्या विकासासाठी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कार्यालयाअंतर्गत अनेक योजना आखल्या जातात; परंतु त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात का? हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. वडार जमात हा दगडाशी संबंधीत कामगार म्हणून मोठ्या संख्येने लातूर जिल्ह्यात वास्तव्यास आहे. मात्र कामगार कार्यालयाअंतर्गत मिळणा-या किती योजना त्यांच्यार्पंत पोहोचतात? हा खरा प्रश्न आहे. असे कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते भटक्या- विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ,महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी कामगार दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लातूर जिल्ह्यात वडार जमात मोठ्या संख्येने वास्तव्यास असताना कामगार म्हणून केवळ बोटावर मोजण्या इतकीच नोंदणी झालेली आहे. त्याला अनेक कारणे कारणीभूत आहेत. त्यातही ज्यांची नोंदणी झालेली आहे. त्यांच्यासाठी कामगार कार्यालयाच्या योजना या केवळ कागदावरच राहिल्या आहेत. काहींनी मागील वर्षापासून आपल्या पाल्याचे शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करून वर्ष उलटले तरी त्यांना लाभ मिळाला नाही. वास्तविक पाहता वर्षभर आर्थिक लाभाचे अर्ज न तपासता प्रलंबित ठेवणे, आर्थिक वर्ष संपताच ते अर्ज निकाली न काढताच काही ना काही त्रृटी काढून रद्द करणे हे अशा प्रकारच्या गोष्टी कामगार कार्यालयाकडून सर्रास होताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात वडार जमात मोठ्या संख्येने वास्तव्यास असतानाही कामगार आयुक्त साहेबांनी मागणी करूनही एकदाही वडार वस्तीस भेट देण्याचे कष्ट घेतले नाही. ग्रामीण भागात आजही वडार समूहास घरकुलाअभावी पडक्या घरात रहावे लागते आहे. याची कुणाला खंत ना सोयरसुतक अशीच वडार समूहातील कामगारांची वर्षानुवर्षे वाताहत होताना दिसून येत आहे.
विकासाचे परिमाण समजले जाणारे रस्ते, कालवे, धरणे, हेमांडपंथी मंदिरे उभा करण्यात वडार जमातीचे मोलाचे योगदान असतानाही आजही त्यांच्यावर रस्त्यावर दगड फोडण्याशिवाय आणि थोड्याश्या जागेत कसेतरी झोपडी बांधून राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर वडार समूहातील कामगारांच्या बाबतीत ही एक फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. वडार जमातीतील किती समूहांना कामगार घरकूल योजनेचा लाभ झाला? कामगार म्हणून वडार महिलांचे किती प्रश्न सोडवले? किती कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभ झाला. आयुक्त साहेब सांगाल का? असेही यावेळी श्रीकांत मुद्दे म्हणाले.
याबाबतीत तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार मेळाव्यामधून कामगार कार्यालय अंतर्गत वडार जमातीला कामगार घरकूल योजनेतून मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून देण्याचे अश्वासन दिले होते.  या दिलेल्या आश्वासनाचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कार्यालयाला विसर पडले आहे का? हाच या ठिकाणी कामगार दिनी प्रश्नचिन्ह निर्माण होतो. याविषयी लातूर जिल्हाधिकारी लक्ष घालतील का? असे सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य श्रीकांत मुद्दे यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR