30.8 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeसंपादकीय विशेष‘बापू’ एक नि:स्पृह व्यक्तिमत्त्व

‘बापू’ एक नि:स्पृह व्यक्तिमत्त्व

विद्यार्थीदशेतच हैदराबात मुक्ती लढ्यात सहभाग, विद्यार्थीप्रिय शिक्षक, एक कुशल संघटक, विविध वृत्तपत्रांचे वार्ताहर, प्रतिनिधी, अनेकांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, राष्ट्रसेवा दलाचे सक्रीय सैनिक, लातूरच्या विकासातील शिलेदार, अशा विविध भूमिका बजावत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, आदर्श शिक्षक जीवनधर सखाहरी शहरकर यांनी लातूरच्या समाजमनावर ‘बापू’ नावाचा एक अमित ठसा उमटवला आहे. एक नि:स्पृह व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. दि. १३ मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि लातूरच्या अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आपल्यातून निघून गेले.

शहरकर गुरूजी यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे दि. ११ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. त्यांचे वडील गावात छोटेसे किरणा दुकान चालवत. शहरकर यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच सरकारी शाळेत झाले. उर्दू माध्यमाच्या या शाळेत रंगनाथराव जोशी, व्यंकटराव देव, खैरातअली मौला, असे नामवंत शिक्षक त्यांना लाभले होते. त्यांनी शिक्षणासोबतच शिस्तही शिकवली. मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांचे वडील सखाहरी यांनी लातूरला घर हलवलं. जीवनधर शहरकर यांनी लातूरला राजस्थान विद्यालयात पाचवीला प्रवेश घेतला. विद्यालयातील सर्व शिक्षक राष्ट्रपे्रमाने भारावलेले होते. लातूर निजाम राजवटीत होते. निजामाविरुद्ध स्टेट काँग्रेसची चळवळ जोरात होती. पंडित नरेंद्र देव, स्वामी रामानंद तीर्थ यांना अटक झाली. विद्यार्थी व शिक्षकांनी राजस्थान विद्यालय बंद केले. राघवेंद्र दिवाण यांनी रेल्वे रोको केला.

त्यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. राघवेंद्र दिवाण आणि बाबूराव कानडे हे राजस्थान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढायचे. ही फेरी गावभर फिरायची. १० ऑक्टोबर १९४६ रोजी चौदाघर मठाची पालखी होती. हरंगूळजवळ सशस्त्र पोलिसांचे ठाणे होते. पालखी बंदोबस्तासाठी सगळे पोलिस लातूरला आल्यानंतर तेथील बंदुकी लुटायचा प्लॅन जीवनधर शहरकर व त्यांच्या सहका-यांनी बनवला. मात्र एक दिवसआधीच या प्लॅनची खबर पोलिसांना मिळाली. जीवनधर शहरकर यांना शोधत पोलिस त्यांच्या घरी गेले. तेव्हा ते शौचासाठी परसात गेले होते. कोणीतरी पोलिस आल्याचे सांगताच ते अंडरवेअरवरच बाहेर पडले. गोरक्षणमध्ये जाऊन गिरजी गुरूजींना घडलेल्या घटनेची माहिती दिली. आप्पासाहेब सावेंना भेटून रेल्वे रुळावरून पायी चालत ते हरंगूळ रेल्वे स्टेशनला गेले.

रेल्वे आल्याबरोबर संडासमध्ये दरवाजा बंद करून ते बसले. ढोकी स्टेशन गेल्यानंतर धोका टळल्याचे लक्षात आल्याने ते बाहेर आले. कुर्डुवाडीला रेल्वेतून उतरून बसने सोलापूरला गेले. तिथे हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या कार्यालयात काम सुरू केले. काही काळ त्यांनी स्टेट काँग्रेसच्या बार्शी कार्यालयातही काम केले. काही दिवसांनंतर शहरकर पुन्हा सोलापूरला गेले. १३ सप्टेंबर १९४८ रोजी मेजर जनरल जे. एन. चौधरी यांनी रणगाड्यांसह निजामी हद्दीत प्रवेश केला. १७ सप्टेंबरला निजामाने संपूर्ण शरणागती स्वीकारली. त्यानंतर लगेच जीवनधर शहरकर लातूरला परतले. त्यांना दहावीच्या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली मात्र त्या वर्षी ते अनुत्तीर्ण झाले. १९५० साली ते मॅट्रिक झाले. ६ जुलै १९५० रोजी जीवनधर शहरकर राजस्थान विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. १९५३ साली अमरावतीच्या पंजाबराव देशमुख विद्यापीठातून ते इंटरमिडीएट झाले. त्यानंतर पुन्हा विद्यालयात रुजू झाले. पुढे शिक्षक म्हणून काम करीत असताना ते बी. ए. झाले. एस. टी. सी.ही पूर्ण केली. त्यांनी ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी, मराठी, नागरिकशास्त्र हे विषय शिकवले. ३० नोव्हेंबर १९८७ रोजी ते सेवानिवृत्त झाले. शिक्षक म्हणून काम करीत असताना त्यांनी पत्रकारिताही केली. त्यांचे सामाजिक क्षेत्रातही योगदान राहिले आहे. त्यांच्या या कार्याची असंख्य वृत्तपत्रांनी दखल घेतली. त्यांच्या जीवनकार्यावर भारत गजेंद्रगडकर संपादीत व मुक्तरंग प्रकाशित ‘आनंदयात्री बापू’ हे पुस्तक खूप चर्चेत राहिले.

-एजाज शेख, लातूर.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR