नागपूर : प्रतिनिधी
राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी कथित घोटाळा प्रकरणी जिल्हा परिषद नागपूर येथील शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे (प्राथमिक) व रोहिणी कुंभार (माध्यमिक) यांना अटक झालीय. या दोन्ही शिक्षणाधिका-यांना सायबर पोलिसांनी अटक केली असली तरी मात्र, या दोन्ही शिक्षणाधिका-यांची न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलीस कोठडी नाकारणे हा पोलिसांना धक्का मानला जातोय.
न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध पोलिस आता वरिष्ठ न्यायालयामध्ये रिव्हीजन दाखल करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. एकाचवेळी दोन शिक्षणाधिका-यांना अटक झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील अपात्र शिक्षक भरती व बनावट शालर्थ आयडी कथित घोटाळा प्रकरणी सदर पोलीस स्टेशन येथे विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व रोहिणी कुंभार या दोघांना अटक करण्यात आली.
शालार्थ आयडी कथित घोटाळा प्राथमिक शिक्षण विभागातील असून, सिद्धेश्वर काळुसे यांच्या कार्यकाळात एकूण १५४ नवप्रविष्ठ शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मूळ शालार्थ आयडी आदेश निर्गमित झाले नसताना सुद्धा त्यांनी स्वत: चे आर्थिक फायद्यासाठी त्यांचे वेतन काढण्याची पुढील प्रक्रिया राबवली. रोहिणी कुंभार या पूर्वी येथे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या येथील २१ मार्च २०२२ ते १५ मार्च २०२४ दरम्यानच्या कार्यकाळात एकूण २४४ नवप्रविष्ठ शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे मूळ शालार्थ आदेश निर्गमित झाले नसताना त्यांनी स्वत: च्या आर्थिक फायद्यासाठी वेतन काढण्याची प्रक्रिया राबवली. यामुळं त्यांचे वेतन काढण्यात येऊन,शासनाची अंदाजे १०० करोड पेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक झाली, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलाय. यावरून काळुसे व कुंभार यांना या गुन्ह्यात गुरुवारी अटक करण्यात आली.
नियम डावलून शिक्षकांची नियुक्ती
नागपूर जिल्ह्यातील ६३३ शिक्षकांचे प्रस्ताव हे शिक्षणाधिकारी कार्यालयात सादरच करण्यात आले नाही. थेट शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर करुन, शालार्थ आयडी तयार करण्यात आला. वेतन प्रक्रियेसाठी आलेल्या फाईलवर प्रक्रियेचा भाग म्हणून रोहिणी कुंभार यांनी काऊन्टर सही केली. यावरून पोलिसांनी त्यांचा या गुन्ह्यात सहभाग दाखवला.