25.4 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपच्या आशीर्वादाने ‘टाटा एअरबस’चे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’

भाजपच्या आशीर्वादाने ‘टाटा एअरबस’चे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’

मुंबई : प्रतिनिधी
भाजप सातत्याने मुंबई व महाराष्ट्रावर अन्याय करत असून महाराष्ट्राच्या प्रगतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा मोठा अडसर आहे. राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्व कुचकामी आहे म्हणूनच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत.

टाटा एअरबसचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून भाजपा व पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प व नोक-या हिरावणा-या महाराष्ट्रद्रोही भारतीय जनता पक्ष युतीला विधानसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

टाटा एअरबस प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये उद्घाटन केले, त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, टाटा एअरबस या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात २२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती तसेच या प्रकल्पामुळे १० हजार रोजगार उपलब्ध होणार होते पण हा प्रकल्प महाराष्ट्रात होऊ दिला नाही.

भाजपाचे केंद्रातील सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या महाराष्ट्रद्रोही भूमिकेमुळे हा मोठा प्रकल्प गुजरातला पळवला. वेदांता फॉक्सकॉन हा १.५० लाख कोटी रुपयांचा प्रकल्पही याच महाराष्ट्रद्रोही लोकांनी महाराष्ट्रात होऊ दिला नाही. भाजपा युती सरकार नोकर भरती करत नाही आणि ज्या प्रकल्पामुळे राज्यातील तरुण मुलामुलींना रोजगार मिळणार होते तो प्रकल्पही गुजरातला पळवला आहे.

राज्यातील उद्योग पळवले
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले नाहीत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असतात. त्या फडणवसांनी टाटा एअरबस प्रकल्पाचे गुजरातमध्ये उद्घाटन झाले आहे, हे डोळे उघडून पाहावे. राज्यातील महाभ्रष्ट युती सरकारमुळेच महाराष्ट्राची प्रगती खुंटली असून राज्य पिछाडीवर गेले आहे. ‘मोदीजी यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार’ अशा थापा मात्र आता शिंदे-फडणवीसांनी मारू नयेत, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR