भारत ६५४ मेगावॅट वीज पुरवठा करणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अचानक आलेल्या महापुरामुळे नेपाळमध्ये मोठा विध्वंस झाला. जीवित हानी, वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली. तेथील जनजीव विस्कळीत झाले आहे. या संकटात भारताने शेजारधर्म पाळला. एक तर भारताने मोठ्या प्रमाणात मदत पाठविली. आता वीजपुरवठा करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारत नेपाळला ६५४ मेगावॅट वीज पाठवणार असून, त्यामुळे आजूबाजूच्या घरांमध्ये १८ तास प्रकाश राहणार आहे. पुरामुळे जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारताने हा निर्णय घेतला. त्यामुळे भारताच्या प्रकाशाने नेपाळ उजळणार आहे.
पुरामुळे नेपाळच्या अनेक जलविद्युत प्रकल्पांवर गंभीर परिणाम झाला, ज्यामुळे नेपाळच्या वीज निर्मिती क्षमतेवर परिणाम झाला. मात्र, या कठीण काळात भारताने नेपाळला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. भारताने नेपाळला अतिरिक्त वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वीज दोन पारेषण वाहिन्यांमार्फत नेपाळमध्ये पोहोचेल. यामुळे नेपाळच्या विजेची गरज मोठ्या प्रमाणात पूर्ण होऊ शकते. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने वीज निर्यातीला मंजुरी दिली आहे. हा वीजपुरवठा १३ सप्टेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत केला जाणार आहे.
















