न्यूयॉर्क : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय टेक्नॉलॉजी) वेगाने होणारा विकास काही काळ मंदावण्याची गरज आहे. त्यामुळे एआयच्या क्षमतेला साजेसे सुरक्षा उपाय विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. हा वेग कमी न केल्यास पुढील ६ ते १२ महिन्यांत एआय इतके सक्षम होऊ शकते की ते संपूर्ण इंटरनेटवर अप्रत्यक्ष नियंत्रण मिळवू शकते, असा गंभीर इशारा अँथ्रोपिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारियो अमोदेई यांनी दिला आहे. प्रत्येकाच्या हातातील मोबाइलमुळे सर्वांकडेच एआय पोहोचले आहे. त्यामुळे त्याचा धोका मोठ्या पातळीवर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.
एआय प्रणाली दिवसेंदिवस अधिक शक्तिशाली होत आहेत. अनेक जटिल कामे त्या माणसांपेक्षा अधिक प्रभावीपणे करू लागल्या आहेत. मात्र, याचबरोबर एआय नियंत्रणाबाहेर जाण्याची आणि त्याचा गैरवापर होण्याची भीतीही वाढत आहे. अमोदेई यांनी त्यांच्या वेबसाइटवरील लेखातून एआय उद्योगावर अधिक देखरेख ठेवण्याची योजना मांडली. एआयचा वेग थोडा कमी केल्यास अत्यंत सक्षम प्रणाली तयार होण्यापूर्वी आणखी एक-दोन वर्षे मिळतील. या काळात मानवी मूल्यांशी एआय प्रणाली जुळवून घेण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित करता येईल, असे त्यांनी म्हटले. याच आठवड्यात एआय संशोधक जेकब कॉक्सन यांनीही अँथ्रोपिकमधून राजीनामा दिला. अँथ्रोपिक आणि ओपनएआय या दोन्ही कंपन्या अतिमानवी बुद्धिमत्तेकडे वेगाने वाटचाल करत असून या प्रक्रियेत मानवजातीच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.
ओपन एआयचेही सुरक्षेला प्राधान्य
ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांनीही कंपनी यंदा समभाग बाजारात प्राथमिक समभाग विक्री आणणार नसल्याचे सांगितले आहे. कंपनीचे लक्ष एआयची सुरक्षा आणि त्याचा वापर मानवी हिताशी सुसंगत ठेवण्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एआय कंपन्यांमध्येच सुरक्षेवरून मतभेद
एआयचा विकास सुरक्षेच्या दृष्टीने काही काळ मंदावावा, अशी मागणी यापूर्वीही होत आली आहे. आता एआय कंपन्यांमधील काही कर्मचा-यांनी राजीनामे देऊन सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चिंता व्यक्त केल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अँथ्रोपिकचे माजी कर्मचारी जो बेंटन यांनी शुक्रवारी राजीनामा जाहीर केला. एआय कंपन्यांमधील अनेक सुरक्षा कर्मचारी जगासाठी योग्य काम करू इच्छितात. कंपन्या अतिमानवी बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या स्पर्धेत अडकल्या आहेत असे त्यांनी म्हटले.
स्पर्धेत कायम राहिल्यास कंपन्यांसाठी धोका
एका कंपनीने विकासाची गती कमी केली तर दुसरी कमी जबाबदार कंपनी पुढे जाऊ शकते. मात्र, स्पर्धेत कायम राहिल्यास स्वत:ची कंपनीही मोठ्या धोक्याचा भाग बनू शकते, अशी चिंता बेंटन यांनी व्यक्त केली.
















