हॉकी वर्ल्डकप स्पर्धा
अमस्टेलविन : वृत्तसंस्था
हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगला. आज झालेल्या करो वा मरोच्या लढतीत भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५-३ अशा फरकाने धुव्वा उडवित स्पर्धेची पुढील फेरी गाठली. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांनी प्रत्येकी २ तर हार्दिक सिंगने एक गोल केला. या विजयामुळे २०१० पासून आतापर्यंत भारताला पराभूत करण्याचे पाकिस्तानचे स्वप्न भंगले.
नेदरलँडस्च्या अमस्टेलविन येथील वैगनर स्टेडियमवर खेळलेल्या गेलेल्या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत पाकिस्तानला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. या शानदार विजयासह भारतीय संघाने विश्वचषकाच्या पुढच्या फेरीत दिमाखात प्रवेश केला. मात्र, पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला. सामना सुरू होताच पहिल्या ५ मिनिटांत भारताच्या हरमनप्रीत सिंगने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ११ व्या मिनिटाला पुन्हा एक गोल मारला आणि भारताने कायम आघाडी घेतली. अखेर ५-३ अशा फरकाने भारताने विजय मिळविला.
















