साऊथम्पटन : वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाला सपाटून मार खावा लागत असून, आधी आयर्लंडविरुद्ध २-० ने मालिका गमावल्यानंतर आता इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही भारताला ४-० असा लाजिवाणा क्लीन स्वीप स्वीकारावा लागला. साउथम्पटन येथील रोझ बाऊल स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा ५६ धावांनी धुव्वा उडवला. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची ही कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली.
कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय भारतीय गोलंदाजांना योग्य ठरवता आला नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. बटलरने अवघ्या ४१ चेंडूंत १३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १३१ धावांची तुफानी शतकी खेळी केली. दुस-या बाजूने कर्णधार ब्रूकने त्याला तोडीस तोड साथ देत ४५ चेंडूंत ४ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ९५ धावा ठोकल्या. या दोघांनी दुस-या विकेटसाठी तब्बल २३३ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि ऐतिहासिक द्विशतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या टी-२० सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद २५७ धावांचा विशाल डोंगर उभा केला आहे.
















