नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम आणि इतर दहशतवादी पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत. त्यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानला करण्यात येणार आहे. हव्या असलेल्या या दहशतवाद्यांची यादी लवकरच पाकिस्तानला सोपविण्यात येणार आहे.
हाफिज सईद हा २००८ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे. मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आहे. पुलवामा आणि इतर हल्ल्यांशी त्याचा संबंध आहे. तर, दाऊद इब्राहिम हा १९९३ चे मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांसाठी भारताला हवा आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात महत्त्वाचा सहभाग असलेला हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाऊद्दीनला २०१७ मध्ये अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. इंटरपोलने नोटीस जारी केली. तो उघडपणे पाकिस्तानात काम करतो.
यापैकी बरेच जण संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेले जागतिक दहशतवादी आहेत. त्यांच्या सहभागाचे पुरावे असलेले अनेक कागदपत्रे पाकिस्तानला सादर करण्यात आली आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानमध्ये मोठे धोरणात्मक बदल होत नाहीत तोपर्यंत थेट प्रत्यार्पण अशक्य आहे.