शिर्डी : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, याला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. मराठा आरक्षणाविरोधात आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून दोन्ही समाजाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या सर्व घडामोडींमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते आज शिर्डीत बोलत होते.
राज्यातील सलोखा बिघडवून समाजाला उद्ध्वस्त करण्याचे काम महायुती सरकार करत आहे. सत्तेच्या लालसेपोटी महायुती सरकारने समाजाला आरक्षणाची लालूच दिली आहे. आता सरकार समाजाला उद्ध्वस्त करत आहे. आरक्षणामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होत आहे , असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
ओबीसींना संविधानाने दिलेले आरक्षणाचे संरक्षण करण्याची मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, महायुती सरकारने महाराष्ट्रात आरक्षणामुळे आग लावलीय. मराठ्यांसह ओबीसींना फिरवण्याचे काम सरकार करत आहे. त्यांच्या या राजकारणामुळे ते भुईसपाट होतील, असा टोला वडेट्टीवारांनी सरकारला लगावला आहे.
लोकांचे पक्ष फोडण्याचे काम, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करणे याशिवाय यांना काहीच कळत नाही. नीट परीक्षेत देशभरात गोंधळ झालाय. ‘नेट’ची परीक्षा रद्द करावी लागली आहे. सरकारला पेपर फुटीच्या मुळापर्यंत का जाता येत नाहीय. नीट तसेच नेट परीक्षांबाबत सरकारने जबाबदारी घ्याला हवी. या संदर्भात एसआयटी स्थापन करून सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.