23.2 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही

शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही

मुंबई : मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय भाजपप्रमाणे आम्हालाही मान्य असेल असे विधान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्यानंतर आता मुख्यमंत्रिपद भाजपला मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. मात्र, शिवसेना नेते उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला असा अर्थ होत नाही. त्यांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निर्णय सोपवला आहे असे विधान उदय सामंत यांनी केले आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल असे म्हणून एकनाथ शिंदे यांनी काल संवेदनशील आणि बाळासाहेबांचा कडवट सैनिक काय असतो, हे सगळ्यांना दाखवून दिले आहे. तसेच, न्याय-अन्यायाकडे बघण्यापेक्षा त्यांनी मतदार आणि मतदानाचा आदर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो आदर दिला आहे, ते देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच घडले आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे उदय सामंत यांच्या विधानावरून मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवर शिंदेसेना अद्याप ठाम आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

याचबरोबर, भाजपचा मुख्यमंत्री झाला तर, शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी उदय सामंत किंवा दादा भुसे यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. याबाबत उदय सामंत म्हणाले, टीव्हीवर काय बातम्या येतात, त्याचा माझ्याशी काहीही संबध नाही. माझ्या राजकीय जीवनाचे काय करायचे, याचा मी सर्व अधिकार एकनाथ शिंदेंंना दिला आहे. तसेच, आमचे काही राजकीय निर्णय देखील घेण्याचे अधिकार आम्ही शिंदेंना दिले आहेत. मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि भविष्यात देखील राहणार, असेही उदय सामंत यांनी सांगितले. दरम्यान, आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. याच बैठकीत महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण? यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR