मुंबई : प्रतिनिधी
मराठा समाजातील महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एका यु-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नवनाथ वाघमारे यांनी वादग्रस्त वक्तव्य करून समाजाच्या आणि महिलांच्या भावना दुखावल्या प्रकरणी शहरातील जालना पोलीस तक्रार देण्यात आली होती. यावेळी मराठा समाज बांधवांनी वाघमारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर दोन समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य आणि महिलांना लज्जा वाटेल असे वक्तव्य केल्याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जालन्याचे पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.
नवनाथ वाघमारे यांनी यु-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ओबीसी नेत्यांच्या कुटुंबातील आंतरजातीय विवाहांचा उल्लेख केला होता. ओबीसी नेत्यांची गोंडस मुले पाहून मराठा समाजाच्या तरुणी घरात घुसतात. स्वत: बावनकुळे यांनी सांगितले की, माझी सून मराठा आहे. माझी बायको कुणबी आहे. त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील. फक्त बावनकुळे यांच्याच नाही तर अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्याच्या मुली घुसल्या आहेत. म्हणजे ओबीसी नेत्यांची, मंत्र्यांची गोंडस मुले दिसली की, मराठ्यांच्या मुली ओबीसी मंर्त्यांच्या घरात घुसतात. ओबीसी नेत्यांची मुलं, त्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्याकडे असलेला पैसा पाहून मराठा समाजातील मुली त्यांच्या घरी लग्न करुन जातात, अश आशयाची टिप्पणी नवनाथ वाघमारे यांनी केली होती.
नवनाथ वाघमारेंनी मागितली माफी
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिलांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी खेद प्रकट केला आहे. आपल्याकडून यापूर्वी कधीही असे वक्तव्य गेले नसून बावनकुळे यांच्यावर मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ओघात आपल्याकडून हे वक्तव्य गेल्याचे स्पष्टीकरण नवनाथ वाघमारे यांनी दिले आहे. राज्यातील भगिनींनी मला समजून घ्यावं आणि मला पदरात घ्यावे, असे नवनाथ वाघमारे यांनी म्हटले. मनोज जरांगेंनी छगन भुजबळ ,मुंडे बंधू-भगिनी आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर केलेल्या शिवीगाळ प्रकरणी मनोज जरांगे कधी माफी मागणार, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
















