परभणी : येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्यावर गर्भवती महिलेच्या प्रसुती प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप ठेवत निलंबीत करण्यात आले आहे. त्यांचे हे निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निलंबन तात्काळ रद्द न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय धडक मोर्चा काढण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने या निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा रुग्णालय परभणी येथे मागील ३ वर्षांपासून डॉ. लखमावार यांनी जबाबदारीने काम करत अधिकारी व कर्मचा-यांना सोबत घेऊन रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाला गती मिळाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयातील एका गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणात डॉ. लखमावार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, या प्रकरणात त्यांची थेट जबाबदारी नसताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे. निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी डॉ. लखमावार यांना आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली नाही. त्यामुळे ही कारवाई नियमबा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. लखमावार यांच्या निलंबनामुळे जिल्हा आरोग्य विभागातील कर्मचा-यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची फेरतपासणी करून डॉ. लखमावार यांचे निलंबन तात्काळ रद्द करावे अशी मागणी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष मनोहर वावळे, जिल्हा प्रभारी प्रमोद कुटे, जिल्हा उपाध्यक्ष रवी वाघमारे, माजी शहर अध्यक्ष रणजीत मकरंद, दिगंबर घोबाळे, शिवा हातागळे, जयराम मोरे, गौसभाई, गजानन कचवे यांच्या स्वाक्षरी आहेत.
















