बीड : प्रतिनिधी
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड सध्या बीड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात आता एक नवा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कसले यांनी माध्यमांसमोर दावा केला आहे की, त्यांना वाल्मिक कराडच्या ‘एन्काउंटर’ची ऑफर देण्यात आली होती. या दाव्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रणजित कसले यांच्यावर यापूर्वी आर्थिक तडजोडीच्या आरोपाखाली निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मात्र कासले यांनी केलेल्या नव्या दाव्यांमुळे पोलिस यंत्रणेतील अंतर्गत हालचाली आणि हत्याप्रकरणाशी संबंधित तपासाची दिशा बदलू शकते, असे संकेत मिळत आहेत. या प्रकरणात आता आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असून, संबंधित अधिका-यांकडून या दाव्याची सत्यता तपासली जाणार आहे. दरम्यान, वाल्मिक कराडविरोधातील गुन्हा आणि सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यातच पोलीस उपनिरीक्षक रणजित कसले यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी त्यांच्याविरोधात निलंबनाचा आदेश जारी केला होता. रणजित कसले हे सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी राज्याबाहेर गेले असता त्यांनी तपासादरम्यान संबंधित प्रकरणात आर्थिक तडजोड केली, असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती स्थानिक पातळीपुरती न राहता थेट राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांपर्यंत पोहोचली.
त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत कासले दोषी आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अधिका-यांकडून चौकशीची पुढील प्रक्रिया सुरू आहे.