प्रयागराज : वृत्तसंस्था
महाकुंभमध्ये ४० कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. यातून २ लाख कोटी रुपयांपर्यंत रेव्हेन्यू जनरेशन वाढण्याचा अंदाज आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
एका माध्यम समूहाने आयोजित केलेल्या सम्मेलनात मुख्यमंत्री योगी म्हणाले, २०१९ च्या आयोजनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत १.२ लाख कोटी रुपयांचे योगदान दिले. यावेळी ४० कोटी भाविक येणे अपेक्षित आहे. या कुंभमेळ्यातून आर्थिक विकासात २ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. एवढेच नाही तर, २०२४ मध्ये जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत वाराणसीमध्ये काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी १६ कोटीहून अधिक भाविक आले. तर अयोध्येत १३.५५ कोटीहून अधिक भाविक आले आहेत, असेही मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले.
संगमच्या १२ किलोमीटर परिसरात स्रान घाट तयार केले जात आहेत. स्वच्छता, बांधकाम आणि सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. याशिवाय सर्व घाटांवर प्रकाश व्यवस्था करण्यात येत आहे.
महिलांसाठी सर्व घाटांवर स्वतंत्र चेंजिंग रूम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घाटावर वेगवेगळे चिन्ह (डमरू, त्रिशूळ इ.) लावण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांना ते सहजपणे ओळखता येतील. या शिवाय, महाकुंभाला होणा-या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. संगम परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर उभारले जात आहेत आणि सर्व घाटांवर पाण्याला बॅरिकेडिंगची व्यवस्था केली जात आहे.
‘वक्फ’ने बळकावलेली जमीन परत घेणार
वक्फच्या नावावर कब्जा केलेली एकेक इंच जमीन राज्य सरकार काढून घेणार आहे. हे वक्फ बोर्ड आहे की भूमाफिया बोर्ड हेच सांगता येणार नाही, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. राज्य सरकारने वक्फ बोर्डाच्या नियमांत बदल केला आहे. आता त्यांच्या ताब्यात असलेली सर्व जमीन तपासली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. वक्फ बोर्डाच्या नावे हडपलेली सर्व जमीन सरकार ताब्यात घेईल आणि त्याचा वापर गरीबांसाठी घरे, शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटल बांधण्यासाठी केला जाईल, असे ते म्हणाले. सनातन धर्माची तुलना कोणत्याही संप्रदाय किंवा धर्माशी केली जाऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच कुंभाची परंपरा वक्फपेक्षा खूप प्राचीन असल्याचे म्हटले.