17.9 C
Latur
Wednesday, November 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहामुंबईतील ६७ मतदार संघाचा कौल मतपेटीत बंद

महामुंबईतील ६७ मतदार संघाचा कौल मतपेटीत बंद

उद्धव ठाकरे-शिंदे सेनेची प्रतिष्ठा पणाला!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणातील सत्ता समिकरणांवर प्रभाव पाडणा-या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या मुंबई महानगर परिसरातील विधानसभेच्या ६७ जागांकरिता आज, बुधवारी मतदान पार पडले. शिवसेनेतील फुटीनंतर होणा-या या निवडणुकीत मतदार कुणाच्या बाजूने कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, आशिष शेलार, जितेंद्र आव्हाड, रवींद्र चव्हाण, गणेश नाईक, आदिती तटकरे आदी दिग्गजांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. राजकीय आरोप- प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर होत असलेली विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावले आहे. त्यामुळे उद्धवसेनेने या निवडणुकीत भावनिक मुद्याला हात घातला, तर शिंदे सेनेने विकासकामे आणि लाडकी बहीण योजनेच्या आधारावर मते मागितली. यापैकी कुणाला मुंबई महानगरातील मतदारांची पसंती मिळते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही वर्षांत शिवसेनेला मागे टाकून भाजपने या परिसरात आपले हात-पाय पसरले. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईत भाजप किती जागा मिळवतो आणि मोठा भाऊ होतो का, याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेबरोबर असल्याने काँग्रेसला जागावाटपात तडजोड करावी लागली. त्याबद्दल या पक्षात नाराजी होती. त्याचा कसा आणि किती परिणाम होतो, हेही मतमोजणीनंतर कळणार आहे.

महामुंबईतील वैशिट्ये….
– एकीकडे मनसे आणि भाजप यांचे सूत जुळलेले असताना दुसरीकडे मनसे व शिंदेसेना यांच्यात सुप्त संघर्ष दिसत आहे. त्याचा कसा आणि किती परिणाम होतो, हेही पाहणे महत्त्वाचे आहे.

– वरळीतून आदित्य ठाकरे पुन्हा विजयी होतात किंवा कसे याची, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोपरी-पाचपाखाडीत उद्धवसेनेने खेळलेले दिघे कार्ड प्रभावी ठरणार की निष्प्रभ होणार, याची उत्सुकता आहे.

– रवींद्र चव्हाण डोंबिवलीचा बालेकिल्ला राखताना किती मताधिक्य मिळवतात? तर मुंब्रा-कळव्यात जितेंद्र आव्हाड यांना त्यांचे शिष्य नजीब मुल्ला किती आणि कसा शह देतात, याची चर्चा आहे.

– बेलापूर आणि ऐरोली हे मतदारसंघ भाजप व शिंदेसेनेतील बंडखोरीमुळे गाजत आहेत. तेथे गणेश नाईक, त्यांचे पुत्र संदीप नाईक आणि मंदा म्हात्रे यांचे भवितव्य पणाला लागले आहे.

– भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचे आरोप झाल्याने नालासोपा-याची निवडणूक उत्कंठावर्धक होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR