शिवसेनेच्या मंत्र्यांकडून अजित पवारांविरुद्ध तक्रारींचा पाढा
मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप
करण्याची केली विनंती
मुंबई : प्रतिनिधी
प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुतीत दिवसागणिक अधिकाधिक खटके उडू लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेकांवर कुरघोड्याचे प्रयत्न सुरु आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन दोन्ही पक्षांत वाद सुरु असताना आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लक्ष्य असताना शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.
दर महिन्याच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या खात्याच्या कामाचा आढावा घेतात. त्याप्रमाणे आजही सह्याद्री अतिथीगृहावर त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत नाराजी बोलून दाखवली. शिवसेना मंत्र्यांना अर्थखात्याकडून मिळत असलेल्या सावत्र वागणुकीबद्दल सर्वच मंत्र्यांनी संताप व्यक्त केला.
निधी वाटपात शिवसेनेच्या खात्यांवर अन्याय होत आहे. तरतूद असलेल्या कामांमध्येही खोडा घातला जात आहे, अशी तक्रार मंत्र्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करायला सांगा, अशी मागणीही मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे समजते. यावेळी अजित पवारांच्या कार्यशैलीबद्दल सेनेच्या सर्वच मंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीत शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांनी तक्रारींचा पाढा वाचला.
शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर अजित पवारांबद्दलच्या तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. त्यावर मी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलतो. लवकरच या प्रकरणात मार्ग निघेल, असा शब्द शिंदे यांनी मंत्र्यांना दिला. त्यामुळे आता या प्रकरणात शिंदे कसा मार्ग काढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विकासकामे करायची कशी?
तीन पक्षांचे सरकार असल्याने सगळ््यांना समान संधी मिळणे गरजेचे आहे. विकासनिधीचे समान वाटप होणे आवश्यक आहे. पण अर्थमंत्री अजित पवार आमच्या खात्यांना पुरेसा निधी देत नाहीत. मग विकासकामे करायची कशी, असा सवाल मंत्र्यांनी शिंदेंना विचारला.