24.6 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeनांदेडमहाराष्ट्राचा विकास भाजपच करू शकतो : शहा

महाराष्ट्राचा विकास भाजपच करू शकतो : शहा

नांदेड: प्रतिनिधी
महाराष्ट्राचा विकास फक्त भाजपच करू शकते. केंद्र सरकारने आत्तापर्यंत महाराष्ट्राला ७ लाख करोड रुपये निधी दिला आहे. काँग्रेसने देशात ७० वर्ष सत्ता भोगली. मात्र महाराष्ट्राचा विकास झाला नाही. भाजपने दहा वर्षात मोठा विकास केला आहे. नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी नांदेडमधून महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना साथ द्यावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नरसी येथील जाहीर सभेत बोलताना केले.

महायुतीचे उमेदवार खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीयमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा दि.११ एप्रिल रोजी नरसी (ता.नायगाव) येथे पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. शहा पुढे म्हणाले की, देशाच्या विकासासाठी भाजप सक्षम आहे. ३७० कलम हटवले. अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली. त्याचबरोबर महाराष्ट्रासह देशात समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचबरोबर महिलांना उज्ज्वला गॅस, गरीबांना स्वस्त धान्य, गरजूंना पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात जालना समृद्धी मार्ग, नागपूर -गोवा द्रुतगती मार्गाचे काम जोरात सुरू आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने मराठवाड्यातील औरंगाबाद व उस्मानाबाद या जिल्ह्याचे नामकरण करून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविला आहे.

काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांनी पाहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील १ कोटी १६ लाख शेतक-यांना किसान सन्मान निधी उपलब्ध करून दिला आहे. शेतक-यांना पीक विमा याचबरोबर शेतीसाठी शासनाने करोडो रुपयाचे अनुदान दिले आहे. शरद पवार यांनी आत्तापर्यंत राज्याला काय दिले, हा प्रश्न सर्वांनी विचारला पाहिजे. राज्यातील नक्षलवादी संपविण्याचे काम केंद्र सरकारच्या मदतीने केले आहे. चंद्रपूर भागात व राज्यातील इतर भागांमध्येही मोठ्या प्रमाणात दहशतवाद निर्माण झाला होता. नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केंद्राने राज्याला पाठबळ दिले त्यामुळे या भागात नागरिक निर्भयपणे राहात आहेत. काँग्रेस हा तीन बिघाडी पक्ष बनला आहे. या बिघाडीमध्ये कोणतेच काम नीट होत नाही. राज्यात भाजपा महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील हे निश्चित असून नांदेडमधून महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना सर्वांनी साथ देऊन मोदी यांचे हात बळकट करावेत, असे आवाहनही यावेळी शहा यांनी केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, कमळ हे चिखलात फुलणारे आहे. खा.चिखलीकर हे निश्चितच नांदेडमधून फुलतील, हा आम्हाला विश्वास आहे. मराठवाड्याचा विकास भाजपनेच केला आहे. नांदेडला सर्वाधिक निधी राज्य सरकारने दिला आहे. यापुढेही निधी कमी पडू देणार नाही. झुकते माप नांदेडला देण्याचा भाजपचा मानस आहे. आता दोन शक्ती एकत्र आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे प्रतापरावांची शक्ती दुप्पट झाली आहे. त्यामुळे त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. ते निश्चितच बाजी मारतील यात शंका नाही, असे मत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR