30.7 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषअभिनेत्यांची राजकीय इनिंग

अभिनेत्यांची राजकीय इनिंग

  • राजकारणाच्या क्षेत्रात अभिनय करावाच लागतो, असे उपहासाने म्हटले जात असले आणि काही वेळा ते प्रत्यक्षातही दिसत असले तरी राजकारण आणि सिनेमा ही दोन्ही क्षेत्रं पूर्णत: भिन्न आहेत. राजकारणातलं कुणी आमदारकी-खासदारकी सोडून नाट्य अथवा सिने-मालिकांच्या क्षेत्रात आल्याचं ऐकिवात नसलं तरी सिनेक्षेत्रात दबदबा निर्माण करणा-या अभिनेत्यांनी राजकारणात येऊन बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला आहे. काहींचा प्रयत्न यशस्वी झाला तर काहींचा फसला ! पण तरीही ही परंपरा मात्र खंडित झाली नाही. यंदा अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील मेरठ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी ‘रामायण’ या गाजलेल्या मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील मेरठ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पक्षाने राजेंद्र अग्रवाल यांचे तिकिट रद्द करून अरुण गोविल यांना तिकिट दिले आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेते अरुण गोविल यांनी अलाहाबादमधून काँग्रेसकडून निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची इच्छा होती. मात्र त्यावेळी अभिनेत्याने राजकारणात येण्यास नकार दिला होता. राज बब्बर : मुंबईत बारा रुपयांत एका व्यक्तीला जेवण उपलब्ध करून देण्याच्या बाता मारून देशभरात चर्चेत येण्याचा प्रयत्न करणारे राज बब्बर आग््रयापासून फतेहपूर सिकरी ते २०१४ मध्ये गाझियाबाद जागेवर पोहोचले. गेल्या पंधरा वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांची राजकीय निष्ठा बदलत राहिली आहे. दोन वेळा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर आग््रयातून संसदेवर निवडून गेलेल्या राज बब्बर यांना काँग्रेसच्या तिकिटावर २००९ मध्ये फतेहपूर सिकरीमधून निवडणूक लढवणे महागात पडले. पण फिरोजाबादच्या जागेवर फेरनिवडणूक झाली आणि राज बब्बर यांनी अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव याचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला. पण २०१४ मध्ये त्यांना गाझियाबादमध्ये पराभव पत्करावा लागला. आता पुन्हा फतेहपूर सिकरीमधून ते निवडणूक लढवत आहेत.

शत्रुघ्न सिन्हा : राज बब्बरप्रमाणे ‘शॉटगन’ नावाने प्रसिद्ध असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांचाही राजकीय प्रवास मोठा रंजक राहिला आहे. ते दोन वेळा राज्यसभेचे सदस्य होते. १९९९ मध्ये जेव्हा भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार बनले तेव्हा शत्रुघ्न सिन्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते. पण मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांचे बिनसले. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विरोध असलेल्या विरोधकांमध्ये शत्रुघ्न सिन्हा सर्वांत अग्रणी होते. विनोद खन्ना : खलनायकापासून नायक झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्याप्रमाणेच विनोद खन्ना यांनीही आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात भाजपमधूनच केली होती. ते १९९७ मध्ये भाजपमध्ये गेले आणि तीन वेळा पंजाबमधील गुरुदासपूरमधून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. एनडीए सरकारमध्ये पर्यटन आणि परराष्ट्र मंत्रालयात राज्यमंत्र्यांची जबाबदारी विनोद खन्नांनी सांभाळली होती. २००९ मध्ये मात्र त्यांना हार पत्करावी लागली.

आपण इतिहासात डोकावून पाहिले तर १९६७ मध्ये चित्रपट क्षेत्रातील एकच सदस्य लोकसभेत पोहोचला होता. १९७१ ते १९७७ या कालावधीत चित्रपट क्षेत्राचे प्रतिनिधित्व शून्य होते. १९८० मध्ये अभिनेत्री वैजयंतीमालाने हा दुष्काळ संपवला. तिने दिल्ली आणि तामिळनाडूमधून दोन वेळा निवडणूक जिंकली होती. याचा व्यापक विस्तार झाला तो १९८४ मध्ये. त्यावेळी सुनील दत्त आणि अमिताभ बच्चन हे त्याकाळातील आघाडीचे नेते होते. त्यावर्षी चित्रपट क्षेत्रातील पाच कलाकार लोकसभेत पोहोचले पण त्यापैकी केवळ सुनील दत्त यांनीच राजकारणाकडे गांभीर्याने पाहिले. गांधी परिवाराशी निगडीत असलेल्या अमिताभने १९८४ मध्ये अलाहाबादमधून निवडणूक जिंकली तेव्हा हेमवतीनंदन बहुगुणासारख्या दिग्गजांचा पराभव केला होता. अर्थात अमिताभ बच्चन यांची महत्त्वाकांक्षा कमी आणि कौटुंबिक मित्र राजीव गांधींची मदत करण्याची इच्छाच अधिक होती. तेव्हा अमिताभ बच्चनच्या चित्रपटाच्या कारकीर्दीला मरगळ आली होती. त्यामुळे त्यांना राजकारणात व्यस्त होण्यास फारसा त्रास घ्यावा लागला नाही. पण बोफोर्स प्रकरणात अमिताभ बच्चन यांच्यावर शिंतोडे उडाले आणि यानंतर राजकारणात त्यांना फारसा रस वाटला नाही. काही काळानंतर अमिताभचा गांधी कुटुंबीयांबरोबर दुरावाही वाढत गेला.

सुनील दत्त : बॉलिवूडमधून ‘पॉलिवूड’मध्ये आलेल्या चित्रपट कलाकारांपैकी राजकारणात सर्वाधिक काळ काढला तो सुनील दत्त यांनी. मुंबई ते अमृतसरच्या सुवर्णमंदिरापर्यंत पदयात्रा करून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघातून ते कधीच पराभूत झाले नाहीत. १९८४ ते २००४ पर्यंत ते पाच वेळा संसदेत निवडून गेले. त्यांना राजकारणात राहूनही कोणताही स्वार्थ नव्हता किंवा पदाची लालसा नव्हती. एखाद्या लोकप्रतिनिधीने आपल्या क्षेत्रातील लोकांच्या आशाआकांक्षांबाबत, समस्यांबाबत, अपेक्षांबाबत किती संवेदनशील असले पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणून सुनील दत्त यांच्याकडे पाहता येईल. राजेश खन्ना : सुपरस्टार हे बिरूद ज्याने मिरवले त्या राजेश खन्नानेही चित्रपटातील आपले स्थान डळमळीत झाल्यानंतर राजकारणाची वाट पकडली. त्याने नवी दिल्लीतून लोकसभेची निवडणूक लढवली. १९९१ मध्ये भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून केवळ १५८९ मतांनी त्याचा पराभव झाला होता. पण १९९२ मध्ये पोटनिवडणुकीत राजेश खन्नाने शत्रुघ्न सिन्हाला पराभूत करून संसद गाठली. १९९६ मध्ये राजेश खन्नाचा पराभव झाला. राजकीय कारकीर्दीत तो सुपरस्टार म्हणून मिरवू शकला नाही.

राजकीय डोहात बुडी मारून हातपाय मारण्याचे प्रयत्न इतरही काही कलाकारांनी केले आहेत. शेखर सुमनने २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पटना साहिबमधून शत्रुघ्न सिन्हांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण निकालामध्ये तो तिस-या क्रमांकावर होता. भोजपुरी चित्रपटांचा विस्तार आणि वाढता प्रभाव याचा परिणाम म्हणजे काँग्रेस आणि भाजपने २०१९ मध्ये या चित्रपटातील मनोज तिवारी आणि रवि किशन हे सुपरस्टार आपल्या बाजूने खेचले होते. २००९ मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर गोरखपूरमधून मनोज तिवारी याने निवडणूक लढवली; पण तो तिस-या स्थानी होता. यानंतर त्याने भाजपात प्रवेश केला. पुढे उत्तर पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवली. २०१२ मध्ये विधानसभा निवडणुकीत मोदींसाठी प्रचार करणा-या परेश रावलला देखील भाजपने अहमदाबादमधून उभे केले होते.

  • -प्रसाद पाटील

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR