24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्र‘मातोश्री’वर ‘मराठा ठोक’ मोर्चा

‘मातोश्री’वर ‘मराठा ठोक’ मोर्चा

रमेश केरे पाटील भाजपचा माणूस; आंदोलनावरून दानवेंचा मोठा आरोप

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने देण्यात आला होता. त्यानुसार, मराठा आंदोलकांनी ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली होती. तसेच, त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकांशी संवाद साधला. तसेच, आरक्षणावर सरकार जी भूमिका घेईल, त्याला पाठिंबा असेल, अशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करणारे रमेश केरे पाटील भाजपचा माणूस असल्याचा आरोप दानवेंनी केला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की, असे थोडी, वेळ घेऊन आले पाहिजे, ते आले आणि उद्धव ठाकरे भेटले, असे थोडेच होते. नीट आले पाहिजे. बोलायला, भेटायला काहीच हरकत नाही, पण हा प्रकार चुकीचा आहे. रमेश केरे म्हणजे, भाजपचा माणूस आहे.

मंत्रालयाजवळ ते भाजप नेत्यांचे बॅनर लावताना ब-याचदा दिसतात. हे सर्व मुद्दाम केले जात आहे. हे रमेश केरे आहेत, ते नेहमी विखे पाटलांच्या चेंबरमध्ये दिसतात, ते नेहमी भाजपच्या नेत्यांचे पोस्टर्स लावताना दिसतात. मराठा आरक्षणाबाबत सरकारने भूमिका घ्यावी, त्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देऊ, असे आम्ही सांगितलेले आहे. उद्धव ठाकरे थोडीच सरकारमध्ये आहेत, त्यामुळे ते कसे काय भूमिका घेऊ शकतात? त्यामुळे यांना थोडेसे डोके असले पाहिजे, यांनी विधान भवनावर गेले पाहिजे, सागर बंगल्यावर गेले पाहिजे.

आमची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाचा ज्यावेळी विधिमंडळात ठराव आला, त्यावेळी एकमताने आम्ही मंजूर केला आहे. आम्ही आमची भूमिका लपवून ठेवली होती का? नाही, सर्वांसमोर मांडली. तसेच, अंबादास दानवेंनी ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करणा-या मराठा आंदोलकांशी संवाद साधला. त्यावेळी अंबादास दानवेंनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

आंदोलनाची घोषणा करणा-यांना नोटीस
‘मातोश्री’बाहेर आंदोलन करण्याची घोषणा करणा-या मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस धाडण्यात आली आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांना खेरवाडी पोलिस ठाण्याकडून नोटीस पाठण्यात आली आहे.

‘मातोश्री’बाहेरचे आंदोलन दरेकरांचे अभियान
– मनोज जरांगे
मुंबईतील आंदोलन दरेकरांचे अभियान आहे. मराठा समाज सर्व पक्षाला जाब विचारण्यासाठी सक्षम आहे. सध्या मराठा समाजाचे महाराष्ट्रात कोणतेही आंदोलन सुरू नाही. हे आंदोलन दरेकरांच्या अभियानाचा भाग असू शकते, आता या आंदोलकांना समाजाच्या नजरेतून पाडू नका, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR