मुंबई : प्रतिनिधी
धनंजय मुंडे यांनी अद्याप सरकारचे ‘सातपुडा’ हे निवासस्थान रिकामे केलेले नाही. याच मुद्यावरून धनंजय मुंडे यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आक्रमक झाल्या आहेत. पुढच्या ४८ तासांत घर खाली करून सरकारने प्रलंबित ४६ लाखांचा दंड देखील वसूल करावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी सरकारला लीगल नोटीस पाठवणार असल्याचा पवित्राही त्यांनी घेतला आहे. त्यामुळे यावर प्रशासन नेमकी काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईत आपल्याला कुठेही घर नसल्यामुळे बंगला सोडला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी आधी माध्यमांशी बोलताना दिले होते. अशातच गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या घराचा उल्लेख केलेला आहे. हे घर सध्या वापरामध्ये नाही, अशी माहिती आहे. यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत.
धनंजय मुंडे जेव्हा सरकारी बंगला वापरत होते तेव्हा ते पहिल्यांदा म्हणाले होते की, माझं मुंबईत घर नाही आणि मला तब्येतीमुळे आणि मुलीच्या शिक्षणामुळे मुंबईत राहणं गरजेचे आहे. तेव्हा देखील आपण म्हटलं होतं की त्यांनी घर भाड्यावर घेऊन राहावं. पण आता कायद्याप्रमाणे त्यांना सातपुडा बंगला खाली करणे भाग आहे, क्रमप्राप्त आहे. पण आत्ताच्या घटकाला आपल्याला दिसतंय की त्यांच्या २०२४ च्या अॅफिडेव्हिटवर वीरभवन नावाची एक बिल्डिंग आहे. जिथे त्यांचा ९०२ नंबरचा फ्लॅट आहे.
मात्र आजही सातपुडा बंगला ठेवणे हे अतिशय चुकीचे आहे. आम्ही आज एक लीगल नोटीस सरकारला पाठवणार आहोत. जर ४८ तासांत ते बंगला खाली करत नसतील आणि ४६ लाखांचा आत्तापर्यंत थकबाकी असलेला दंड आहे तो देखील देत नसतील तर आम्ही सरकारला प्रश्न करू. हा दंड देखील वसूल करण्यात यावा आणि तातडीने मुंडे यांची रवानगी त्यांच्या घरी करण्यात यावी. ४८ तासांत त्यांनी ते घर खाली करावं, असा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला आहे.