सांगली : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनात पुन्हा प्राण फुंकला आहे.मराठ्यांचे भगवे वादळ लवकरच मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. जरागेंनी सरकारला धडकी भरवणारी घोषणा सांगली जिल्ह्यातून केली आहे. यापूर्वी एकदा वाशीच्या वेशीवर आणि नंतर आझाद मैदानात आंदोलन झाले होते.
पश्चिम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसह राज्यातले मराठी बांधव आता आंतरवाली सराटीला येऊन मुंबईकडे रवाना होतील का काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, असे मोठे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. २९ ऑगस्ट रोजीचे आंदोलन हे मुंबईला होतंय की? काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याची भावना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
जी चूक केली त्याबद्दल बोला, लोकांचा रोष कमी होईल. कुणबी प्रमाणपत्र द्या. सरकारने मराठा समाजाला प्रचंड हिणवले आहे. ३ वर्षात किती मोर्चे झाले आणि या काळात काय दिले असा सवाल त्यांनी केला. मराठा समाजाचा पुन्हा मुंबईला जाण्याचा देखील विचार आहे. मला अनेक मराठा नेत्याच्या फोन येतो, आमदार,खासदार फोन करून तुम्ही म्हणताय ते पटते असे सांगतात, राणेंसारखे अनेक मराठा नेते आता बोलू लागले आहेत, याचे स्वागत आहे. सरकारचा माज उतरवणार असल्याचे ते म्हणाले.
मनोज जरांगेंचे भव्य स्वागत
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसापासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचा दौरा सुरू आहे. कवठेमंकाळ बोरगाव यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये स्वागत व सभा झाल्या आहेत. आज पश्चिम महाराष्ट्र दौराचा समारोप करत असताना सांगली जिल्ह्यातील विटा येथे मनोज जरांगे यांचे भव्य दिव्य पद्धतीने स्वागत होत आहे.















