नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. आता भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पुढील आठवड्यात दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून १५ आमदारांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौ-यावर आहेत. ते भारतात परत आल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम नाव निश्चित केले जाईल.
गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा आणि भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची निवड करण्यात येणार, हे ठरणार आहे. भाजपकडून निवडून आलेल्या ४८ आमदारांपैकी १५ आमदारांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. आता या १५ निवडलेल्या आमदारांच्या नावांमधून ९ नावे वगळून मुख्यमंत्री, मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित केले जाईल. यासोबतच, विधिमंडळ पक्षाची बैठक १७ किंवा १८ फेब्रुवारी रोजी होऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौ-यावरून परतल्यानंतर दिल्लीत सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये भाजपच्या अनेक आमदारांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा यांचे नाव सर्वाधिक जास्त चर्चेत आहे. याचबरोबर, दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विजेंदर गुप्ता, सतीश उपाध्याय, मनजिंदर सिंग सिरसा, पवन शर्मा, आशिष सूद, रेखा गुप्ता आणि शिखा राय यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले जात आहे.