पाकचे ड्रोन हल्ले, भारताचाही पाकिस्तानात घुसून क्षेपणास्त्र वर्षाव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानने भारताविरुद्ध आधी नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि जम्मूसह पंजाब, राजस्थानातही ड्रोन हल्ले करीत आपल्या कुरापती सुरू ठेवल्याने अखेर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाला आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानने अख्ख्या पाकिस्तानात ब्लॅकआऊट जारी केला. भारतानेही सीमावर्ती भागात ब्लॅकआऊट केला आहे. पंजाब, अंबाला, राजस्थान आणि हरियाणातील गावांना ब्लॅक आऊट करण्यास सांगितले. तसेच सायरन वाजताच प्रतिसाद देऊन ब्लॅकआऊट करण्याचे आदेश देण्यात आले.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने अचानक भारतावर हल्ले सुरू केले. गुरुवारी अंधार पडताच पाकिस्तानने सीमेनजीकच्या भारतातील विविध शहरांमध्ये १०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. एकट्या राजस्थानमधील जैसलमेरमध्ये ७० पेक्षा जास्त क्षेपणास्त्रांचा मारा केला. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानची सर्व क्षेपणास्त्रे हवेतच हाणून पाडली. त्यानंतर भारताने प्रत्युत्तर लाहोरमधील पाकिस्तानचे एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल (अवॉक्स) नष्ट केले. तसेच फैसलाबाद, सरगोधा, मुलतान आणि सियालकोट शहरांतील संरक्षण प्रणालीही नष्ट केली. जम्मू, पंजाब, राजस्थानमध्ये केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानवर हल्ला चढविला.
पाकिस्तानाने सीमा ओलांडून केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील १६ शहरांवर मोठे हवाई हल्ले केले. राजधानी इस्लामाबादसह सियालकोट, बहावलपूर, लाहोर, कराची आणि रावळपिंडीसारख्या प्रमुख शहरांना भारताने लक्ष्य करीत जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यांमुळे पाकमध्ये मोठी खळबळ उडाली. पाकिस्तानच्या कुरापती गुरुवारी दिवसभर सुरू राहिल्या. आधी पाकिस्तानने भारताच्या काही भागांत हल्ला केला होता. त्यामुळे भारताने जशास तसे उत्तर दिले. पाकिस्तान चांगलाच घाबरला असून भारताने अधिक हल्ला करू नये, म्हणून पाक सरकारने अख्ख्या देशातच ब्लॅकआऊट केले. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे पाकिस्तानी नागरिक प्रचंड हादरले आहेत.
दरम्यान, भारतातील सर्व विमानतळांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले. भारताच्या तिन्ही सैन्यांना अलर्ट राहण्याचे आदेशही दिले. पाकिस्तानात गुरुवारी रात्री सर्वत्र क्षेपणास्त्र, ड्रोनचा मारा सुरू केला. एकीकडे हवाई हल्ले सुरू झालेले असतानाच समुद्रमार्गेही हल्लाबोल सुरू केला. त्यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली.
पाकिस्तानची ४ विमाने पाडली
पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसून हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानची ४ लढाऊ विमाने पाडली. यामध्ये तीन एफ-१७ आणि एका एफ-१६ लढाऊ विमानांचा समावेश आहे. यापैकी एका विमानातील वैमानिकालाही पकडण्यात आले.
शाळा बंद, सुट्टा रद्द
पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम बंगालने मोठा निर्णय घेतला आहे. या ठिकाणच्या सरकारी अधिकारी, पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या. तसेच या भागातील शाळांना पुढील आदेशापर्यंत सुट्या देण्यात आल्या आहेत.
८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
पाकिस्तानकडून युद्धाबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जाऊ नये, चुकीची माहिती दिली जाऊ नये म्हणून भारताने एकूण ८ हजार ट्विटर खाती बंद केली आहेत. पुढील आदेश येईलपर्यंत ही खाती बंद राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.