पाणबुडी मिळण्यास ३ वर्षे विलंब
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फटका भारताला बसला आहे. भारताला हवी असलेली पाणबुडी आता तब्बल ३ वर्षे उशिराने मिळणार आहे. भारताने रशियाकडून अकुला श्रेणीच्या आण्विक पाणबुड्या भाड्याने घेण्यासाठी ३ अब्ज डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी केली होती. हा करार २०१९ मध्ये झाला होता आणि ही पाणबुडी २०२५ मध्ये दिली जाणार होती. मात्र, युक्रेनसोबतच्या युद्धामुळे २०२५ पर्यंत ही पाणबुडी भारताला देण्यास रशियाने असमर्थता दर्शविली. आता ही पाणबुडी २०२८ मध्ये देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पाणबुडी मिळण्यास विलंब होणार आहे.
रशिया-युक्रेनमध्ये गेल्या वर्षभरापासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांचे सैनिक परस्परांवर जोरदार हल्ले करीत आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून जोरदार प्रयत्न केले. त्यात भारतानेदेखील पुढाकार घेतला. परंतु अद्याप हे युद्ध थांबलेले नाही. अजूनही हल्ले सुरूच असल्याने रशिया-युक्रेनमध्ये तणावाची स्थिती कायम आहे. या युद्धामुळे अन्य देशांबरोबर केलेले करारही थंड बस्त्यात पडले आहेत. या युद्धाचा इतर देशांबरोबरच भारतालाही मोठा फटका बसला आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे विलंब झाला तरी रशियाने २०२७ पर्यंत अकुला श्रेणीच्या पाणबुडी द्याव्यात, असे भारताने रशियाला म्हटले. हिंदी महासागरात चीनची वाढती घुसखोरी पाहता भारताला शक्य तितक्या लवकर आपला आण्विक पाणबुडीचा ताफा मजबूत करायचा आहे. त्यामुळे रशियाने लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी, यासाठी भारताने पाठपुरावा केला. परंतु रशियाने आण्विक पाणबुडी देण्यास ३ वर्षे विलंब लागेल, असे म्हटले आहे.
भारत सरकारच्या सीसीएसने म्हणजेच पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीनेही दोन स्वदेशी आण्विक पाणबुड्या तयार करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे भारतीय नौदलाची सामरिक क्षमता वाढणार आहे. या पाणबुड्यांच्या बांधणीमुळे हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रात नौदलाची ताकद वाढणार आहे. या पाणबुड्या विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये तयार केल्या जातील. या पाणबुड्या ९५ टक्के स्वदेशी असतील. या अरिहंत क्लासपेक्षा वेगळ््या असतील आणि त्या प्रोजेक्ट अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वेसल अंतर्गत तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतर आणखी ४ पाणबुड्या तयार करण्याची योजना आहे.