मुंबई : प्रतिनिधी
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नबंधनात अडकले आहेत. उदयपूरमध्ये सकाळी १०.१० वाजता हिंदू परंपरेनुसार या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याला दोघांचे कुटुंबीय आणि काही मोजके पाहुणे उपस्थित होते.
वैदिक मंत्र आणि वाद्यांच्या गजरात विजयने रश्मिकाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. यावेळी नववधू म्हणून रश्मिका अत्यंत सुंदर दिसत होती. दुपारी ४.३० वाजता कोडाव परंपरेनुसार दोघे पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. विजय आणि रश्मिका यांनी पती-पत्नी म्हणून आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो अद्याप समोर आले नाहीत. परंतु हळद आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे विविध फोटो विजय आणि रश्मिका त्यांच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर करत आहेत.
‘गीता गोविंदम’, ‘डिअर कॉम्रेड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केले आहे. ‘गीता गोविंदम’ हा त्यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी ‘डिअर कॉम्रेड’मध्येही स्क्रीन शेअर केला. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं गुपचूप एकमेकांना डेट करत होते. आपल्या रिलेशनशिपविषयी दोघांनीही कमालीची गुप्तता पाळली होती. अखेर लग्नाच्या काही दिवस आधी विजयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली.

