मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पूरपरिस्थितीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून दुपारी बारा वाजता ३७१६ वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरीत सुरू झाला. नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पुराचे पाणी लागले आहे. दुसरीकडे आषाढी एकादशीच्या निमित्ताने येणा-या भाविकांमुळे उजनी धरणात होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. राज्यात बहुतांश धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे .
राज्यातील बहुतांश मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. पुण्यात गेल्या वर्षी १५ टक्क्यांवर असलेला उपयुक्त जलसाठा यंदा ५८.२१ टक्क्यांवर आहे. नाशिकच्याही बहुतांश धरण क्षेत्रांमध्ये चांगला पाऊस झाल्याने गेल्यावर्षी १७ टक्क्यांवर असलेला पाणीसाठा यंदा ५२.५४ टक्क्यांवर आहे. मराठवाड्यातीलही बहुतांश धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे.
रायगड जिल्ह्यातील १७ धरणं फुल्ल!
रायगड जिल्ह्यात रात्री मुसळधार पावसाने अलिबाग, मुरूड, रोहा, नागोठणे परिसराला झोडपून काढले. त्यामुळे धरणांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २८ धरणांपैकी १७ धरणं १०० टक्के भरली असून रायगड जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे उन्नई धरण क्षमतेपेक्षा अधिक भरले आहे. धरणातून होणा-या विसर्गामुळे कुंडलिका नदी पातळीत मोठी वाढ झाली असून पाणी नदीपात्राच्या इशारा पातळीपर्यंत पोहोचले आहे. सध्या नदीची पाणीपातळी २३.१० मीटरवर पोहोचली आहे.
खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला
पुणे घाटमाथ्यासह शहरात तसेच धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे रात्री बारापासून ६४५१ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी-जास्त केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
उजनीतून पाण्याचा विसर्ग बंद
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी येणा-या लाखो भाविकांना चंद्रभागेच्या पाण्यात सुरक्षित पवित्र स्नान करता यावे यासाठी उजनी धरणातून गेल्या काही दिवसांपासून भीमा नदीत सोडण्यात येणा-या पाण्याचा विसर्ग आज पूर्णपणे थांबविण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत होता. सध्या उजनी धरणात १०२ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात जवळपास १२,००० क्युसेक विसर्गाने पाणी जमा होत आहे.
गोसेखुर्द धरणातून २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
भंडा-यात गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून १५००० क्युसेक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सुरू आहे. धरणाचे पाच दरवाजे आणि दोन्ही जलविद्युत प्रकल्पांतून हा पाण्याचा विसर्ग होत आहे. मागील चार दिवसांत गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने आज सकाळी ११ वाजल्यापासून हा विसर्ग सुरू केला. नदीपात्रातून आवागमन करणा-यांनी स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन गोसेखुर्द धरण प्रशासनाने केले आहे. दुपारी २ वाजता गोसेखुर्द धरणाचे आणखी चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.आता एकूण नऊ दरवाजांतून ४०,८९८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे .
कोयना धरणातून विसर्ग वाढणार
उत्तर महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून पावसाची हजेरी कायम असल्याने कोयना धरणातून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणात ५६ टीएमसी पाणीसाठा आहे. महाबळेश्वरच्या पावसानेही दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला. बहुतांश मोठे प्रकल्प ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत भरले आहेत. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. कोयना धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे आज सकाळच्या सुमारास धरणात २८ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. गेल्या २४ तासांत कोयना धरणात अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.