मुंबई : प्रतिनिधी
अमरावती येथील रुग्णालयातील आग आणि बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. रुग्णालयांमध्ये आग लागून निष्पाप बालकांचे बळी जाणे ही अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या ३ वर्षांत महाराष्ट्रात ५ वर्षांखालील तब्बल ४० ते ४४ हजार बालकांचा कुपोषण, विषबाधा, सर्पदंश आणि उपचारांअभावी मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू गरीब कुटुंबांतील मुलांचे असून अंगणवाड्यांमध्ये जनावरांनाही न शोभेल असे निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
आधी भंडारा आणि आता अमरावतीत घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी सरकारने पुढच्या ६ महिन्यांत सर्व रुग्णालयांचे ऑडिट पूर्ण करून त्रुटी दूर कराव्यात. एखाद्या कर्मचा-याला निलंबित करून प्रकरण दाबण्यापेक्षा निष्काळजीपणा करणा-या कंत्राटदारांवर थेट गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी लावून धरली.
मतदार याद्यांमधून लाखो नावे वगळल्याचा आरोप
महाराष्ट्रात सुमारे २ कोटी ६ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली असल्याचा दावा करत पवार म्हणाले की, विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बीएलओ वर दबाव आणून हा टेबल सर्व्हे करण्यात आला आहे. ३० तारखेला अंतिम यादी आल्यावर यातील त्रुटी उघड केल्या जातील.
साखरेची दरवाढ व सट्टेबाजी
साखर कारखान्यांकडे पुरेसा साठा असतानाही बाजारात साखरेचे दर वाढवले जात आहेत. ग्राहकांची लूट करणा-या अशा साठेबाज आणि सट्टेबाजांवर सरकारने कडक कारवाई करावी, असे ते म्हणाले.
















