पुणे : प्रतिनिधी
राज्यात आता थंडीची लाट पसरली आहे. फेंगल चक्रीवादळ तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पुढील २४ तासांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात वर्षातील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगाव शहरासह अनेक ठिकाणी तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवताना दिसून येत आहेत.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी पुण्यात रात्रीचे तापमान ९.९ अंश सेल्सिअस इतके होते. यंदा कडाक्याची थंडी पुण्यात जाणवू लागली आहे. वर्षातील हे पहिलेच एक अंकी किमान तापमान नोंदवले गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये फेंगल चक्रीवादळ तयार झाल्यामुळे राज्यात आर्द्रता कमी होणार असून आणखी थंडी वाढणार आहे. या वादळामुळे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे काही राज्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात थंडीचा अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र व विदर्भात देखील थंडी वाढली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगरमध्ये ९.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राज्यात दुस-या क्रमांकाचे सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात नोंदवले आहे, पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान नोंदवले गेले आहे. महाबळेश्वर येथे किमान तापमान ११.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. हवेली आणि एनडीएसह अन्य भागात अनुक्रमे ९.१ आणि ८.९अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
पुण्यात कमाल तापमान २८.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. शहरातील तापमानात मोठी घट झाल्याने रात्री आणि सकाळच्या वेळी शहरात धुक्याची चादर जाणवण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडीत वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कडाक्याच्या थंडीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या भागात १० अंशांवर आले तापमान
नवी मुंबई, पालघर, मुंबई, ठाणे, उपनगर, रायगड आणि पुण्यात गेल्या काही वर्षांमधील सर्वांत कमी तापमानाची नोंद काल (बुधवारी) झाली आली. शहरात गारवा वाढला असून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, लोणावळा, शिरूर, भागात तापमान १० अंशांवर आले होते.