मुंबई, साता-यात हजेरी, आता राज्यात अनुकूल स्थिती
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आता मान्सूनचे आगमन झाले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून पावसाच्या सरी बरसल्या आहेत. राज्यात सर्वदूर मान्सून पोहोचला आहे. आगामी सात ते आठ दिवसांमध्ये राज्यातील वेगवेगळ््या भागांत मान्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असून, जलाशय आणि धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होऊ शकते. तसेच पेरण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो.
राज्यात पालघर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे तर ठाणे आणि मुंबई या दोन जिल्ह्यांसाठी आजपासून पुढचे ३ दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला. या काळात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला तर उद्यापासून पुढचे चार दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट म्हणजेच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता तर उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच त्यापुढचे तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्यासाठी पावसाचा यलो अलर्ट आहे तर त्यापुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. पुण्यात आज घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला तर इतर ठिकाणी पुढच्या पाच दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. विदर्भातही नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडा-यातही पावसाची शक्यता आहे.
अनेक जिल्ह्यांसाठी
४ दिवस अलर्ट
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पुढील चार दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला तर जालन्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. यानंतर २६ जूनला पावसाची शक्यता आहे. परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना २६ जूनसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नांदेडमध्ये आज आणि २५ जूनलाही पावसाची शक्यता आहे.
लातूर-धाराशिवमध्ये
सलग ४ दिवस पाऊस!
लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना उद्यापासून सलग चार दिवस पावसाची शक्यता आहे. पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला तर अकोल्याला आजपासून पुढचे दोन दिवस आणि अमरावतीला आजपासून पुढचे तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला.
















