33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे म्हणजे वाघ माणूस, दिल्लीसमोर झुकणार नाही

राज ठाकरे म्हणजे वाघ माणूस, दिल्लीसमोर झुकणार नाही

मुंबई : राज ठाकरे हे वाघ माणूस आहेत. मात्र त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधा-यांकडून होत आहे. राज ठाकरे हे दिल्लीच्या सत्तेपुढे कधीही झुकणार नाहीत, असे ते वारंवार सांगत होते. मात्र, दिल्लीची वारी त्यांना करावी लागली. यात कुठेतरी त्यांना अडचणीत आणण्याचे, त्यांना पिंज-यात अडकवण्याचे काम सत्ताधा-यांकडून होतेय का, अशी शंका सध्या महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधा-यांवर टीकास्त्र डागले आहेत.

आज होणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांची भूमिका ही सत्ताधा-यांविरोधात नसेलच असा कयास सध्या बांधण्यात येतोय. मात्र, राज ठाकरे दिल्लीच्या तक्तापुढे झुकणार नाहीत, ही प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे. म्हणूनच आज राज ठाकरे जे काही बोलतील ते सत्ताधा-यांच्या विरुद्ध असेल आणि दिल्लीश्वरापुढे झुकणारे नसेल, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी बोलताना व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासण्याचे काम

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विचार आणि भाषा किती असांस्कृतिक आहे, हे काल महाराष्ट्रातील जनतेने बघितले आहे. काल चंद्रपूर येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडलेल्या प्रचारसभेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासण्याचे काम त्याठिकाणी केले गेले आहे का, अशा विचारांना महाराष्ट्रातील जनता योग्य तो धडा शिकवेल, अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवारांवर केली. अर्धवट माहितीचा आधार घेऊन अशा पद्धतीने किळसवाणे वक्तव्य करणे हे महाराष्ट्रातील कुठल्याही माणसाला न पटणारे आहे. तसेच जनता देखील अशा खालच्या स्तरावरील विचारांना कधीही खपवून घेणार नाही. अशा प्रवृत्तीला आगामी काळात जनता योग्य तो धडा शिकवेल, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी बोलताना व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR