28.7 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीचे विलिनीकरण, ३५ आमदारांचा पाठिंबा!

राष्ट्रवादीचे विलिनीकरण, ३५ आमदारांचा पाठिंबा!

राष्ट्रवादीचे आमदार खोसकर यांचा दावा
राष्ट्रवादीत वाद, तटकरेंची सारवासारव
मुंबई : प्रतिनिधी
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावे, अशी इच्छा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील सुमारे ३५ आमदारांची असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते हिरामण खोसकर यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यासंदर्भात मी हिरामण खोसकर यांच्याशी नक्की बोलेन. ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील. त्या संदर्भात आम्ही बसून चर्चा करू, असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सारवासारव केली.

यावेळी तटकरे यांनी थेट उत्तर न देता सावध पवित्रा घेतला आणि त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. त्यामुळे पक्षांतर्गत चर्चांना अधिक वेग येण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणावर अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. मात्र, पक्षातील काही आमदारांकडून एकत्र येण्याची इच्छा व्यक्त होत असल्याने येत्या काळात या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या साप्ताहिकात एक लेख लिहिला. या लेखात शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत मोठा दावा केला. विलीनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देण्याचा विचार होता, मात्र ते स्वप्न अपूर्ण राहिले, असे त्यांनी नमूद केले. आता अजितदादांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे त्यांनी लेखात म्हटले. तसेच अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे अजित पवारांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करावा लागला, असा दावा करत गेल्या चार ते पाच महिन्यांपासून झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, असे शिंदे म्हणाले. यावरून अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी हा लेख ‘अत्यंत चुकीचा आणि गैरलागू’ असल्याचे म्हटले. अशा प्रकारचे लिखाण टाळावे, अशी विनंतीही त्यांनी केली. एवढेच नव्हे तर यापुढे अशा आरोपांची पुनरावृत्ती झाल्यास योग्य पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशाराही तटकरेंनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR