लातूर : प्रतिनिधी
अक्षय तृतीया, एक शुभ आणि पवित्र दिवस, ज्या दिवशी शुभ कार्यांना सुरुवात करणे अत्यंत फलदायी मानले जाते. हा दिवस हिंदू संस्कृतीत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या दिवशी आंबा खाण्याची विशेष परंपरा आहे. अक्षय तृतीयेला आंबा खाण्याची प्रथा केवळ एक परंपरा नाही, तर तिच्यामागे अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत. आंबा, फळांचा राजा, अक्षय तृतीयेच्या दिवसासोबत जोडलेला आहे. अक्षय तृतीयेला आंबा खाण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. अनेक ठिकाणी या दिवशी पितरांना अर्पण करण्यासाठी आंबा वापरला जातो. या दिवशी आंबा खरेदी करणे आणि तो खाणे शुभ मानले जाते. त्यामुळे लातूरच्या फळ बाजारात २९ एप्रिल रोजी १५० टन आंबा दाखल झाला आहे.
लातूर जिल्ह्याबाहेरुन दशेरी, हापूस, मलिका, बदाम आदी प्रकारचे आंबे लातूरच्या फळ बाजारात येत असले तरी स्थानिक केशर आंबाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. अक्षय तृतीयामुळे गेल्या चार दिवसांत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इथला केशर आंबा राज्यातच नव्हे तर परराज्यातही गोडवा वाढवत आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली आदी भागांतून केशरला मागणी .हे येथील फळ बाजारात दररोज किमान १५० टन आंबा विक्रीसाठी येत आहे. लातूरची फळ बाजारपेठ केशर आंब्यासाठी देशभरात नावारुपाला येत आहे. येथील बाजारातून परराज्यातील व्यापारी आंबा खरेदीसाठी येतात. यथून खरेदी करण्यात आलेला आंबा थेट परराज्यात जात आहे.
फळबाजारात दररोज १५० टन आंब्याची आवक होत आहे. केशरला प्रतिटन ६० हजार ते १ लाख रुपयांप्रमाणे विक्री सुरु आहे. किरकोळ विक्री मात्र दीडशे ते दोनशे रुपये किलोप्रमाणे होत आहे. या दोन दिवसांत आंब्याची आवक वाढली त्यामुळे भाव घसरले आहेत. मंगळवारी केशर ५० ते १०० रुपये किलो, बदाम ४० ते ६० रुपये किलो, मलिका ३० ते ५०, हापूस ५० ते ७५ रुपये किलो दराने व्रिकी होत आहे. सध्या येथील फळ बाजारात बसवकल्याण, हुमनाबाद, जहिराबादसह लातूर जिल्ह्यातून आंब्याची मोठी आवक आहे. मागील आठ दिवसांत दररोज दीडशे टन आवक होत आहे. या आंब्याला परराज्यातून मागणी आहे, असे फळाचे ठोक विक्रेते बरकत बागवान यांनी सांगीतले.