22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयलोकसभेत गदारोळ

लोकसभेत गदारोळ

कॉंग्रेसचे चन्नी यांच्या आरोपानंतर मंत्री बिट्टू आक्रमक, वाद पेटला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. गुरुवारी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. कॉंग्रेसचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी यांनी भाजप सरकारच्या धोरणावर कडाडून प्रहार करतानाच केंद्रीय रेल्वे तथा अन्न प्रक्रिया राज्यमंत्री रवनीतसिंह बिट्टू यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. त्यावेळी बिट्टू यांनी आक्रमक होत थेट वेलमध्ये उतरून दोन हात करण्याची भाषा सुरू केली. त्यावेळी विरोधी पक्षाचे सदस्यही वेलमध्ये उतरले. त्यामुळे जोरदार गोंधळ उडाला. त्यावेळी कामकाज स्थगित करण्यात आले.

कॉंग्रेसचे खासदार चन्नी यांनी मोदी सरकारच्या कार्यशैलीवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप सरकार आणीबाणीची भाषा करते. परंतु विरोधी पक्षाचे संसद सदस्य आणि आंदोलक शेतक-यांबद्दल सरकार जसे वागले, तीदेखील आणिबाणीच होती. २०-२० वर्षांपासून सदस्यांना बोलू दिले जात नाही, हीदेखील आणीबाणीच आहे, असे म्हटले. याचवेळी चन्नी यांनी राज्यमंत्री बिट्टू यांना टोला लगावताना म्हटले की, ज्या दिवशी तुम्ही कॉंग्रेस सोडली, त्याचदिवशी आपले दादा बिअंत सिंह यांचा मृत्यू झाला, असे म्हटले. त्यावेळी बिट्टू यांनी माझे दादा कॉंग्रेससाठी नाही तर देशासाठी शहीद झाले, असे सांगत कॉंग्रेस नेत्यांसह चन्नी यांच्यावर हल्ला चढविला. एवढेच नव्हे, तर ते बाह्या सारून दोन हात करण्यासाठी थेट वेलमध्ये उतरले. तेव्हा चन्नी यांच्यासह कॉंग्रेस सदस्यही वेलमध्ये उतरले. त्यामुळे गदारोळ वाढला. अखेर सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले.

राजनाथ सिंह यांची मध्यस्थी
यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी सुरू झाली. तेव्हा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपच्या काही सदस्यांनी बिट्टू यांची समजूत काढून त्यांना जागेवर बसविले. दुसरीकडे राहुल गांधी यांनीही कॉंग्रेस सदस्यांना जागेवर बसण्यास सांगितले. त्याचवेळी पीठासीन पदाधिकारी संध्या राय यांनी २ वाजेपर्यंत कामकाज स्थगित केले. त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनीही शांततेचे आवाहन केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR