मुंबई : प्रतिनिधी
लोकसभेत वक्फ दुरूस्ती विधेयक मांडल्यानंतर महाराष्ट्रात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर, त्यातील तरतूदी पाहून वक्फ बोर्डाने बेकायदेशीरपणे बळकावलेल्या किंवा अतिक्रमण केलेल्या हिंदू शेतकरी आणि देवस्थानच्या जमिनी, तसेच काही मुस्लिम जनतेच्या जमिनी परत करू, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज (दि. २) लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले. वक्फ विधेयकाद्वारे सरकार कोणत्याही धर्माच्या बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. हे विधेयक केवळ मालमत्तेच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे. मंदिर, मशीद किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनाशी त्याचा काहीही संबंध नाही, असे मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत आपल्या भाषणात स्पष्ट केले.