मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आझमी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. भाजपसह इतर पक्षांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आता अबू आझमी यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.
दरम्यान, वारीमुळे रस्ता जाम होतो. हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही. मात्र, मुसलमानांनी रस्त्यावर नमाज केल्यावर तक्रारी केल्या जातात. त्यांच्या या वक्तव्यावर समाज माध्यमांतून टीकेची झोड उडाली होती.
त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, माझ्या वक्तव्यामुळे गैरसमज पसरवण्यात आले. माझे वक्तव्य तोडूनमोडून दाखवले गेले. माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावनांना ठेच पोहोचली असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. माफी मागतो. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असे आझमी यांनी म्हटले आहे.
आझमी पुढे म्हणाले की, मी एक निष्ठावंत समाजवादी कार्यकर्ता आहे. मी नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती, सूफी संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो. वारी परंपरेचे पालन करणा-या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. वारीची परंपरा महाराष्ट्राच्या आंतरधर्मीय, समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अभिमानास्पद भाग आहे.
मी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लिम समुदायाविरुद्ध होणा-या भेदभावाच्या आणि त्यांच्या हक्कांच्या संदर्भात केला होता. मी कोणत्याही प्रकारची तुलना केली नव्हती. माझा हेतू आणि माझी मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी तसे म्हटले होते. अल्पसंख्याक समुदायाच्या मनात या देशात वेगवेगळे कायदे आहेत, अशी भावना निर्माण होऊ नये, हा माझा हेतू होता, असे आझमी यांनी म्हटले.