लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाणा-या आरोपीस उदगीर ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून, या कारवाईत प्रतिबंधित गुटखा व महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन असा १३ लाख ७७ हजार ९६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लोणी मोड, उदगीर येथे महिंद्रा कंपनीची पांढ-या रंगाची स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एमएच-१४-सीएच-३२३२ मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू,डायरेक्टर स्पेशल पानमसाला, रजनीगंधा असे प्रतिबंधित पदार्थ आढळून आले.
पोलिसांनी सदर प्रतिबंधित पदार्थ व महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन असा १३ लाख ७७ हजार ९६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी निसार हसनमिया शेख, वय ४९, रा. गवळीपुरा, स्टेशन रोड, नांदेड यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९६/२०२६, कलम १२३, २२३, २७४, २७५, ६२ भारतीय न्याय संहिता तसेच कलम ५९ अन्न सुरक्षा व मानके कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तिडके हे करीत आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी.डी. गाडे, पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोग्यास घातक व शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या प्रभावी कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणा-यांना मोठा इशारा मिळाला आहे.
.
















