परभणी : मागील अनेक वर्षांपासून परभणीला गद्दारी आणि फुटीरतेची पार्श्वभुमी आहे. परंतू येथील मतदार मात्र कायम शिवसेनेसोबत राहील्याचा आपल्याला गर्व वाटतो. ज्या मतदारांनी महाविकास आघाडीला व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला खासदार म्हणून निवडून दिले होते त्यांनी मात्र पक्ष व मतदारांसोबत गद्दारी केली. त्यामुळे मी मतदारांची क्षमा मागतो व परभणीकरांनी महापालिकेत आमची सत्ता आणली त्या बद्दल धन्यवाद द्यायला आलो आहे. बंडखोरी केलेले विकासासाठी नाही तर खासगी निधीसाठी तिकडे गेले असल्याचे सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर हल्लाबोल केला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौ-यावर आले असून शनिवारी रात्री त्यांचे परभणीत आगमन झाले. शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात रविवार, दि.२८ रोजी त्यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी पक्ष प्रमुख ठाकरे बोलत होते. यावेळी युवा नेते खा. संजय राऊत, आ. आदित्य ठाकरे, खा. अरविंद सावंत, खा. अनिल देसाई, माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे, माजी आ. मिराताई रेंगे, महापौर सय्यद इकबाल, डॉ. विवेक नावंदर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले, नुकतेच पार पडलेले ऑपरेशन टायगर नसून ते ऑपरेशन देवेंद्र आहे. आमच्या सोबत राहण्याची शपथ घेऊन सुद्धा ती शपथ मोडल्याचे दुष्परिणाम त्यांना दिसून येतील. खाजगी निधीसाठी हे तिकडे गेले आहेत. मिळालेला खासदार निधी कुठे खर्च केला, किती वेळेला लोकसभेत हजेरी लावली, मंत्र्यांना विकास कामासाठी भेटले का याचा अहवाल आमच्याकडे आहे. ज्या प्रायव्हेट विमानातून यांनी प्रवास केला त्यासाठी कोणाचा पैसा खर्च झाला होता या सर्व गोष्टींवर पक्ष प्रमुख ठाकरे यांनी कडाडून प्रहार केला.
राम मंदिर स्थापन व्हावे अशी सर्व हिंदूंची इच्छा होती. मात्र, भाजपने रामाच्या नावाने दुकान उघडले आहे. कार सेवकांचा संघर्ष देखील भाजपा विसरली. केवळ मंदिराच्या आडून घृणास्पद कामे केली जात आहेत. राम मंदिरातील चोरी म्हणजे एक प्रकारे हिंदुत्वाशी केलेली गद्दारी असल्याचा आरोप यावेळी पक्ष प्रमुख ठाकरे यांनी केला. मागच्या वेळी अतिवृष्टी झाली तेंव्हा आपण स्वत: शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. परंतू यावेळी हा गद्दार आपल्यासोबत नव्हता. केवळ दिखाऊपणासाठी मोर्चात सहभागी झाला होता अशा शब्दात पक्ष प्रमुख ठाकरे यांनी खा. जाधव यांना बंडखोरीवरून फटकारले.
यावेळी खा. संजय राऊत म्हणाले की, जगात जर्मनी आणि भारत परभणी का म्हणतात याचा प्रत्यय काल आला. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे परभणीत काल आगमन झाले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक हजर होते. परभणीतील मतदार कायम शिवसेनेसोबत आहेत. शिवसेनेत कितीही आले आणि गेले पण त्याचा पक्षाला काही फरक पडला नाही अशा शब्दात त्यांनी खा. संजय जाधव यांच्या बंडखोरीचा समाचार घेतला.
या जाहीर सभेचे सुत्रसंचलन बाळासाहेब राखे यांनी केले. यावेळी विधानसभा प्रमुख कल्याणराव रेंगे, जिल्हा प्रमुख विष्णू मुरकुटे, जिल्हा प्रमुख रविंद्र धर्मे, नंदकुमार आवचार, अरविंद देशमुख, सदाशिव देशमुख, राम खराबे, बंडू नाना बिडकर, संतोष बोबडे आदिसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदानाचा अपमान करणा-यांवर विश्वास ठेऊ नका
पक्षाशी गद्दारी करून इतर पक्षात गेलेले आम्ही विकासासाठी तिकडे गेल्याचे सांगत आहेत. ज्यांनी तुमच्या मताला विकले, तुमच्या मतदानाचा अपमान केला त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेऊ नका. आपल्यात धमक असेल तर आपण विरोधात राहून सुध्दा काम करू शकतो. इथले खासदार जरी पक्ष सोडून गेले असले तरी जिल्ह्यात चारही आमदार निवडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. तुम्ही सत्तेच्या ताकदीवर शिंगाची आणि आरेरावीची भाषा करू नका. जनता आता क्रांतीसाठी रस्त्यावर उतरणार असून यांना जमिनीत गाडल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा आ. डॉ. राहूल पाटी यांनी या जाहीर सभेत बोलताना दिला.
















