नागपूर : राज्यात सध्या सर्वच राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी करत आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीत मोदींना बिनशर्त पाठिंबा देणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिला असून, मनसेने ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, राज ठाकरे विदर्भाच्या दौ-यावर असून, विदर्भातील विधानसभेच्या सर्व ६२ जागा लढवण्याचा मानस मनसेचा आहे. त्या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.
यापूर्वी विदर्भात काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना पहावयास मिळत असे. विदर्भ हा काँग्रेसचा गड मानला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपली ताकद दाखवली आहे. शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) गटही आपली ताकद आजमावणार आहे. अशातच आता मनसेनेही विदर्भातील सर्व जागा लढण्याची तयारी सुरू केली आहे, यामुळे विदर्भात चांगलाच धुरळा उडणार आहे. राज ठाकरे हे सध्या विदर्भाच्या दौ-यावर आहेत. त्यांनी बुधवारी भंडारा आणि गोंदियातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्याबरोबर चर्चाही केली. मनसेकडे निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे असे मनसे नेते तेजस मोहतुरे यांनी सांगितले.
या उमेदवारांना जाहीर केली उमेदवारी
दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवडीतून बाळा नांदगावकर, पंढरपूरमधून दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. विदर्भातूनही राज ठाकरे काही जणांची उमेदवारी जाहीर करू शकतात असे यावेळी तेजस मोहतुरे यांनी सांगितले आहे. विदर्भात मनसेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या दौ-या दरम्यान यवतमाळमधील वणी विधानसभा क्षेत्रात राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.