लातूर : प्रतिनिधी
सध्याच्या बदलत्या परिस्थितीत मुलींना विविध आव्हानांना सामोरे जावे लागत असून, विशेषत: इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना छोटीशी चूकदेखील भविष्यात गंभीर परिणाम घडवू शकते. त्यासाठीसोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत, अनोळखी व्यक्तींशी अनावश्यक चॅटिंग करू नये, स्वत:ची वैयक्तिक माहिती किंवा छायाचित्रे कोणासोबतही शेअर करू नयेत, तसेच नोकरी अथवा इतर कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. सोशल मीडियावरील छायाचित्रांचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक किंवा मानसिक त्रास देण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे इंटरनेटचा वापर हा जबाबदारीने आणि पूर्ण सजगतेने करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले.
लातूर पोलीस दलाकडून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता, सुरक्षितता आणि पोलिसांशी संवाद वाढविण्यासाठी ‘पोलीस विद्यार्थी संवाद’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांकडून शाळा व महाविद्यालयांना नियमित भेटी देऊन विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद साधण्यात येत आहे. दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे हर्षदा जोशी पुराणिक लिखित ‘स्त्री स्वयंरक्षणार्थाय : एक पाऊल सजगतेकडे’ या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी विद्यार्थिनींशी पोलीस अधीक्षक तांबे बोलत होते. दरम्यान, विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सजगता आणि धैर्य निर्माण करून त्यांना सुरक्षितपणे पुढे जाण्यास प्रेरणा देणारे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल लेखिका हर्षदा जोशी पुराणिक यांचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी कौतुक केले. लातूर पोलीस दलाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत जनजागृती, संवाद आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.















