27.6 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeपरभणीविद्यार्थ्यांनो आयुष्याचा खरा आनंद घेण्यासाठी ध्येय निश्चित करा : प्रा.रवींद्र बनसोड

विद्यार्थ्यांनो आयुष्याचा खरा आनंद घेण्यासाठी ध्येय निश्चित करा : प्रा.रवींद्र बनसोड

परभणी : दहावी आणि बारावी ही विद्यार्थ्यांसाठी यशाची पहिली पायरी आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी या काळात कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. आयुष्यात खरा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला ध्येय निश्चित करावे लागेल, असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ प्रा.रवींद्र बनसोड यांनी केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी नीट, जेईई, सीईटी व स्पर्धा परीक्षा संदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले.

आ.डॉ.राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) परभणी विधानसभेच्या वतीने गुरुवार, दि.२७ रोजी अक्षदा मंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी शिक्षण तज्ञ प्रा. रवींद्र बनसोड, आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अंकित बावणे, १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार सचिन धस, शिक्षण अधिकारी आशा गरुड, एम.सी.ए चे राज्य सहसचिव संतोष बोबडे, सह संपर्क प्रमुख विवेक नावंदर, महेश पाटील, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, दलीत आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले, वैद्यकीय प्रवेशासाठी ७०:३० कोटा पध्दतीमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. मराठवाड्यात केवळ ६ तर विदर्भात ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत. अशा परिस्थितीत ७०:३० कोटामुळे वैद्यकीय शिक्षणास प्रवेश घेऊ इच्छिणा-या मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांना फटका बसत होता. या विरोधात आपण परभणीत स्वाक्षरी आंदोलन केले तसेच विधानभवनाच्या पाय-यावर बसुन सरकारचे लक्ष वेधले, अधिवेशात आवाज उठवला त्यामुळे तक्तालीन महाविकास आघाडी सरकारने हा कोटा रद्द करुन अन्याय दुर केला आहे. आता मुलींच्या मोफत शिक्षणासाठी व सर्व स्पर्धा परीक्षेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आपला लढा सुरु राहणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगीतले. दोन वैद्यकीय महाविद्यालयासह अन्य शैक्षणीक संकुलामुळे परभणी शिक्षणाची पंढरी होत आहे. अजुनही उच्च शिक्षणाची सोय परभणीत झाली पाहीजे यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे असे आ.डॉ.पाटील म्हणाले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोचिंग क्लासेस शिक्षक, प्राध्यापकांचा तसेच दिव्याग शिक्षकाचा पुष्पहार सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर दहावी, बारावी, नीट, सीईटी, जेईई परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा पाल्यांसह गुणगौरव करण्यात आला. प्रास्ताविक आयोजक आ.डॉ.राहुल पाटील यांनी केले. या प्रसंगी क्रिकेटर अंकित बावणे, संतोष बोबडे, डॉ.विवेक नावंदर, महेश पाटील प्रा.रवींद्र बनसोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गजनान काकडे यांनी केले. यावेळी ६४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, दलीत आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.

मुलींच्या मोफत शिक्षणासाठी लक्षवेधी मांडणार
मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरणा-या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७०:३० कोटा पद्धत रद्द करण्यासाठी आपण सातत्याने अधिवेशनात व बाहेर आवाज उठवल्यामुळे हा कोटा रद्द झाला. आता उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली. परंतू ती अद्यापही लागू झाली नाही. यासाठी १ जुलै रोजी राज्य विधिमंडळात लक्षवेधी मांडून मुलींच्या मोफत शिक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे आ.डॉ.राहुल पाटील यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR