पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. १२ मे रोजी होणा-या निवडणुकीसाठी ३० एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ आली असताना, एका जागेसाठी ७० ते ७५ जण इच्छुक आहेत.
या चर्चेला आणखी बळ मिळाले ते आमदार अमोल मिटकरी यांच्या ट्विटमुळे. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट करत जय पवार यांच्या उमेदवारीला पक्षातील अनेक इच्छुकांनी पाठिंबा दिल्याचा दावा केला आहे. अनेक इच्छुकांनी मला संपर्क करून जय दादा यांच्या उमेदवारीसाठी सहमती दर्शवली आहे. त्यांनी हा पाठिंबा लेखी स्वरूपात पक्षश्रेष्ठींना द्यावा, अशी मागणीही मिटकरी यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षात नवे राजकीय समीकरण तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
मिटकरी यांनी यापूर्वीही जय पवार यांना विधान परिषदेत पाठवण्याची मागणी केली होती. त्यांच्या मते, पक्षाला भविष्यात बळकटी देण्यासाठी एक तरुण आणि विश्वासू चेहरा पुढे आणण्याची गरज आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वानंतर पक्षाला पुढे नेण्यासाठी जय पवार सक्षम पर्याय ठरू शकतात, असे त्यांनी नमूद केले आहे. हा चेहरा पक्षासाठी संजीवनी ठरेल, असेही त्यांनी आपल्या भूमिकेत स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका जागेसाठी प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही ७० ते ७५ जण इच्छुक असल्याची माहिती दिली आहे. या यादीत विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन यांसारख्या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे या सर्व इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.
या परिस्थितीत पक्षनेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एका जागेसाठी अनेक दावेदार असल्याने अंतिम निर्णय घेणे कठीण ठरत आहे. जय पवार यांना संधी दिल्यास इतर इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो, अशीही चर्चा सुरू आहे. आता अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाणार आहे.

