Homeराष्ट्रीयआता देशात ‘वंदे भारत कार्गो’ धावणार

आता देशात ‘वंदे भारत कार्गो’ धावणार

अभिनव योजना... मालवाहतूक क्षमता आणि वेग वाढणार चेअर कार, स्लीपर, मेट्रो नंतर नवीन प्रयोग

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची वंदे भारत संकल्पना प्रचंड सुपरहिट झाली आहे. वंदे भारत ट्रेन भारतीय रेल्वेचा एक नवीन ब्रँड म्हणून उदयास आली आहे. वंदे भारत ट्रेनची सेवा देशभरात सुमारे १६४ मार्गांवर सुरू आहे. वंदे भारत ट्रेन प्रवाशांना हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी, सुरक्षा व आलिशान सुविधा पुरवते. वंदे भारत चेअर कार, वंदे भारत स्लीपर या सेवा सुरू असून, वंदे भारत मेट्रोचाही विस्तार करण्याचा मानस रेल्वेचा आहे. यासह आता वंदे भारत कार्गो म्हणजे मालवाहतूक करण्यासाठी वंदे भारत संकल्पनेची मदत घेतली जात आहे.

भारतीय रेल्वेने वंदे भारत कार्गो या ट्रेनचे प्रोटोटाइप तयार केले असून याच्या चाचणीला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. वंदे भारत कार्गो ट्रेनची चाचणी यशस्वी झाल्यास भारतीय रेल्वेत मालवाहतुकीचा एक नवीन अध्याय सुरू होईल, असे म्हटले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेने मालवाहतुकीकडे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. मालवाहतुकीसाठी विशेष मार्गही सुरू करण्यात आले आहेत. याचा प्रचंड मोठा फायदा रेल्वेला गेल्या काही वर्षांत झालेला आहे. याचाच एक भाग म्हणून आता भारतीय रेल्वे वंदे भारत कार्गो सेवेत आणली जाणार आहे. दरम्यान, वंदे भारत ट्रेनचा प्रोटोटाइप इंटिग्रल कोच फॅक्टरीने (आयसीएफ) विकसित केला आहे. वंदे भारत कार्गो कार्यान्वित होण्यापूर्वी, तिचा वेग, आपत्कालीन ब्रेकिंग प्रणाली आणि भार वाहून नेण्याची क्षमता यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. या चाचण्यांमध्ये या हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनची सुरक्षितता आणि कार्यक्षमता यांचेही मूल्यांकन केले जाईल असे सांगितले जात आहे.

पहिल्या कार्गोची चाचणी सुरू
पहिल्या वंदे भारत कार्गोची चाचणी सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी ताशी १६० किलोमीटर वेगाने २६४ टनांपर्यंत माल वाहून नेण्याची क्षमता आहे. दिल्ली-एनसीआर आणि मुंबईसारख्या व्यस्त मार्गांवर वंदे भारत कार्गो सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वंदे भारत कार्गोला १६ डबे असतील. भारतीय रेल्वे ‘वंदे भारत कार्गो’ सुरू करण्यासाठी मालवाहतूक प्रणालीचे आधुनिकीकरण करत आहे. याचा प्रोटोटाइप चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आला आहे.

मालाची नासाडी थांबणार
रेल्वेची संशोधन शाखा, आरडीएसओ, सुरक्षा आणि इतर मापदंडांवर चाचणी करणार आहे. वंदे भारत कार्गो सुरू करून भारतीय रेल्वेचा मालवाहतुकीला गती देण्याचा आणि कमी खर्चात एका बाजारपेठेतून दुस-या बाजारपेठेत मालाची सहज वाहतूक करणे हा उद्देश आहे. यामुळे नाशवंत मालाची नासाडी टाळण्यासही मदत होईल, असे म्हटले जात आहे.

ट्रेनची वैशिष्ट्ये
– जास्तीत जास्त वेग : १६० किमी/तास
– क्षमता : २६४ टन
– कोच : १६ डब्यांची रॅक
– पॉवर : ५०% (ईएमयू कॉन्फिगरेशन)
– दरवाजे : १८०० मिमी स्वयंचलित प्लग डोअर्स
– मालवाहतूक : पॅलेटाइज्ड कंटेनर्स, ज्यामध्ये तापमान नियंत्रित (रीफर) युनिट्सचा समावेश आहे.
– निर्माता : आयसीएफ चेन्नई
– चाचणी : आरडीएसओ लखनौ

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR