लातूर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी शासकीय विश्रामगृहातील सभागृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांची निवेदने स्वीकारली. यावेळी लातूर जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी रस्ते, भूसंपादन, कृषी, उद्योग, भूमापन आणि आरोग्य यांसारख्या विविध विषयांवरील निवेदने सादर केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, अहिल्या गाठाळ, गणेश पवार, सायली ठाकूर, उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे आणि जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जनसंवाद कार्यक्रमात प्राप्त झालेली निवेदने संबंधित कार्यालयांकडे पाठवली जातील. त्यावर तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून त्याबाबतची माहिती अर्जदार व विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर करावी. यापुढे दर एक-दोन महिन्यांनी लातूर येथे आढावा बैठक घेऊन या निवेदनांवर झालेल्या कार्यवाहीचा प्रकरणनिहाय आढावा घेतला जाईल, असे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले. तसेच प्रत्येक प्रशासकीय अधिकारी व कर्मचा-याने केवळ सकारात्मकच नाही, तर गतिशीलतेने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.















