लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेच्या उत्तर बाजूस लघु पाटबंधारे विभागाचे नुकताच नव्याने स्वतंत्र कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा विरोधी पक्ष व जिल्हा परिषदेच्या सदस्यांना अंधारात ठेवून करण्यात आला. शुक्रवारी झालेल्या या सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील, उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिराजदार, कृषी व पशुसंवर्धन सभपती कविता गोरे, महिला व बालकल्याण सभपती शिवकन्या गोडभरले, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अस्लम तडवी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी शाम वाखर्डे, विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
लातूर जिल्हा परिषदेत ग्रामीण पाणी पुरवठा व लघू पाठबंधारे विभागाचा कारभार अनेक वर्षापासून एकत्रच चालत होता. नुकतेच शासनाने कामात सुसुत्रता यावी म्हणून दोन विभाग वेगळे केले आहेत. लघू पाटबंधारे विभागाचा कारभार आता जिल्हा परिषदेच्या उत्तर बाजूस असलेल्या इमारतीमध्ये नुकताच सुरू झाला आसून या कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी थाटात पार पडले. जिल्हा परिषदेच्या आवारात एखादा कार्यक्रम होत असेल तर त्याची रितसर माहिती प्रशासन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती विरोधी पक्षनेता व सभागृहाचे सदस्य यांना दिली जाते. मात्र सकाळी एका कार्यालयाचे उद्घाटन होते. याची माहिती विरोधी पक्ष नेत्यांनाही दिली जात नाही. या संदर्भाने विरोधी पक्षनेत्या आशाताई भिसे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. हा नवा प्रघात पडत असल्याची चर्चाही जिल्हा परिषदेत दिवसभर सुरू होती.
















