लातूर : प्रतिनिधी
सहकार आणि साखर उद्योगात आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवणा-या लातूर तालुक्यातील वैशालीनगर, निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्यास डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन-इंडिया, पुणे (डीएसटीए) यांच्या वतीने ‘सर्वोतकृष्ट सहकारी साखर कारखाना-२०२६’ हा मानाचा विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल लातूर पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
या सत्कार प्रसंगी पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण आणि सदस्य गुरुनाथ गवळी, सौ. तनुजा चव्हाण, सौ. प्रिया उफाडे, सौ. पूजा जाधव, सौ. शिवानी शिंदे, सत्यनारायण पाटील, विलास उफाडे, बाळासाहेब कदम, सौ. दिपाली कराड, अंशकित गायकवाड, अमोल देडे, सौ. सुनंदा स्वामी, सौ. पूजा ढगे, गणेश ढगे, अनिल कराड, जनक गायकवाड, भास्कर शिंदे, नितीन जाधव, बापूसाहेब चव्हाण, नामदेव उफाडे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला विलास कारखाना सहकार महर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नियोजनानुसार तसेच माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख आणि कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली कारखान्याला आजपर्यंत सहकार आणि साखर उद्योगाशी निगडित राज्य व राष्ट्रीय पातळीवरील तब्बल ३८ पुरस्कार मिळाले असून, या पुरस्काराने त्यात आणखी एका मानाच्या शिरपेचाची भर पडली आहे. यावेळी चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी पंचायत समितीच्या पदाधिका-यांनी केलेल्या सत्कारा बद्दल सर्व लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानले.
















