मुंबई : वृत्तसंस्था
कुणाची अर्धा, कुणाची एकरभर जमीन, त्यातही तीन-तीन वाटेकरी… आता कुठे पाणी आलं होतं तोपर्यंत सरकारची नजर पडली अन उभं वावर हिसकावून घेऊ लागलेत. वाड-वडिलांनी कितीही संकटे आली तरी या काळ्याभोर आईचा तुकडाही विकला नाही, आता मात्र सरकारच आमचं काळीज काढून घेतंय असा आक्रोश करत बुधवारी शक्तीपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यातील शेतक-यांनी मुंबईतील आझाद मैदानात पहाटेच धडक मारली.
जिच्यावर रोजचं पोट भरतंय ती जमीनच गेली तर जगायचं कसं या विवंचनेने बायका पोरांच्या डोळ्याला डोळा लागत नाही म्हणत उमरी (ता. अर्धापुर, जि. नांदेड)येथील शेतकरी माधव भिसे या शेतक-याने आसवे गाळली. खोबराजी एकनाथ मूधळ हा तरुण शेतकरीही याच गावचा. दोन चुलत्यांसह नऊ एकर जमीन. एलदरी धरण प्रकल्पामुळे पहिल्यांदा केळी रानात पिकल्याचा आनंद त्याच्यासाहित कुटुंबाला झाला होता; मात्र, यातील तब्बल सात एकर जमीन महामार्गात जात असल्याने उभ्या कुटुंबाचे हातपाय गळाले आहेत. आवाज उठवला तर ही जमीन वाचेल म्हणून चुलत्यांसह पहाटेच मुंबईत आल्याचे खोबराजीने सांगितले. २०-२१ वर्षाच्या तरण्याबांड पोरापासून ७०-७५ वर्षाच्या वयोवृद्ध शेतकरी या मोर्चात मोठया आशेने सहभागी झाले होते.
माझ्या ६० गुंठे जमिनीपैकी ३० गुंठे जमीन सरकार बळकावत आहे. एकतर सरकार पाणी देत नाही, महागाई करून ठेवली आहे. आम्ही कसंतरी जगतोय, तेही सरकारला बघवत नाही, अशा भावना ज्ञानेश्वर पडोळे (पळसगाव, ता. वसमत, जि. हिंगोली) या शेतक-याने व्यक्त केल्या.
या मोर्चात १२ जिल्ह्यातील महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ व भुदरगड तालुक्यातील महिलांची संख्या अधिक होती. रात्रभर प्रवास करूनही १२ जिल्ह्यातील शेतकरी या मोर्चात मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
व्हान्नूर (ता. कागल) येथील सुरेश सपकाळ यांची पाऊण एकर जमीन महामार्गात जात आहे. त्यांच्या ४२ फूट विहिरीसह त्यांच्या भावकितील सात विहिरी या महामार्गात गडप होणार आहेत.जर न्याय नाही मिळाला तर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरे बांधणार असल्याचा इशारा दिला.
निमशिरगाव(ता. शिरोळ) येथील तिथी शिवाजीराव कांबळे यांची पिकाऊ सगळीच जमीन महामार्गात जात असल्याने आपल्या मुलांचे काय होणार या चिंतेने त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. लाडक्या बहिणींना ओवाळणी देऊ नका, पण बहिणींची जमीन काढून घेऊ नका अशी आर्त हाक तिथी कांबळे यांनी दिली.
चौकट
शेतक-यांच्या अडचणींवर चर्चा करू : फडणवीस
शक्तीपीठ महामार्ग हा महामार्ग नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत १२ जिल्ह्यांमधून जाणार असून, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शक्तिपीठांना जोडणारा आहे. याविषयी शेतक-यांच्या अडचणींवर चर्चा करू अशी ग्वाही देत यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आज सांगितले. राज्यातील वाहतुकीचा वेग आणि सुविधा सुधारतील. पुरवठा साखळी मजबूत होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. शेतक-यांना अधिक चांगल्या रीतीने बाजारपेठेपर्यंत पोहोचता येईल. त्यामुळे यासंबंधी विरोध करण्याऐवजी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.