लंडन : वृत्तसंस्था
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामन्याचा निकाल निराशाजनक लागला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने या निर्णयाचा पुरेपूर फायदा उचलला. इंग्लंडने ५० षटकात ३ गडी गमावून ३८७ धावा केल्या. पण हे आव्हान भारतीय संघाला पेलवले नाही. भारताने ५० षटकांत ७ गडी गमावून ३६० धावा केल्या. हा सामना भारताने २७ धावांनी गमावला. यासह भारताने ३ सामन्यांची वनडे मालिका १-२ ने गमावली. यामुळे रोहित शर्माची शतकी खेळी व्यर्थ गेली.
इंग्लंडने विजयासाठी दिलेले ३८८ धावांचे आव्हान गाठताना भारताने आश्वासक सुरुवात केली. कर्णधार शुबमन गिल आणि रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी १४७ धावांची भागीदारी केली. गिल ७७ धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दुस-या विकेटसाठी ८६ चेंडूत ११३ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा ११० चेंडूत १३८ धावा करून बाद झाला. त्यानंतर भारताची घसरगुंडी सुरू झाली. इशान किशन १४ धावा करून तंबूत परतला. उपकर्णधार श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाला. कोहलीने ६० चेंडूत ७४ धावांची खेळी केली. फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. के. एल. राहुल ८ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. त्याचवेळी पराभव निश्चित झाला. भारताने निर्धारित ५० षटकांत ३६० पर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे भारताचा पराभव झाला.
















