सोलापूर : शासनाच्या अमृत २योजनेंतर्गत९८२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव महापालिकेकडून अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे (एमजेपी) सादर करण्यात आला आहे. एमजेपीकडून हा प्रस्ताव साधारणतः दोन आठवड्यात शासनाकडे पाठविण्यात येईल. अत्याधुनिक पाणीपुरवठा यंत्रणेसह दररोज पाणीपुरवठ्याचे नियोजन यामध्ये प्रस्तावित आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
सोलापूर शहरातील अंतर्गत जलवाहिनी तसेच नव्या पाण्याच्या टाक्या या संदर्भात सोलापूर महापालिकेने शासनाच्या अमृत दोन योजनेंतर्गत ९८२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविला होता. त्यामध्ये एमजेपीने काही त्रुटी काढल्या होत्या. त्यानंतर महापालिकेने प्रस्तावात काही बदल करून तो पुन्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविला आहे. साधारणतः दोन आठवड्यात हा प्रस्ताव शासनाकडे जाईल, त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.
या प्रस्तावात बरेच बदल करण्यात आले आहेत. शहरातील ज्या भागात जलवाहिनी जुन्या झाल्या आहेत. तसेच जलवाहिनी पोहोचलेली नाही तेथे जलवाहिनी टाकणे, नव्या २० पाण्याच्या टाक्या, अत्याधुनिक व्हॉल्व्ह यंत्रणा यासह दररोज पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रस्तावित करण्यात आले आहे. साधारणतः दोन वर्षांत टेंडरसह ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर या कामास प्रारंभ होईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
या योजनेसाठी संभाजीनगरला शासनाने सॉफ्ट लोन घेण्यास सांगितले आहे. त्यांना अनुदान मिळाले नाही. कदाचित त्या अनुषंगानेही सोलापूर महापालिकेला नियोजन करावे लागेल. सोलापूर महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या सक्षम नाही. एकूण ४५ टक्के खर्च वेतनावर होतो. कर्ज घेणे परवडणारे नाही तरीही वेळ आली तर घ्यावे लागेल. याचा भार शहरातील नागरिकांवर पडेल. याबाबतीत अद्याप शासनाने काहीही सांगितलेले नाही, असेही आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले.